‘अतिक्रमण’चा कार्यभार महेश आहेरांकडे कायम; माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांचे सूचक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 06:25 AM2023-03-28T06:25:03+5:302023-03-28T06:25:10+5:30
ठाणे : महापालिकेतील वादग्रस्त सहायक आयुक्त महेश आहेर यांची चौकशी होईपर्यंत त्यांच्याकडील कार्यभार काढण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु ...
ठाणे : महापालिकेतील वादग्रस्त सहायक आयुक्त महेश आहेर यांची चौकशी होईपर्यंत त्यांच्याकडील कार्यभार काढण्याचे आदेश देण्यात आले होते; परंतु त्यांच्याकडील आस्थापना विभागाचा कार्यभार काढण्यात आला असला तरी अतिक्रमण विभागाचा कार्यभार तसाच ठेवण्यात आला आहे. हा विधिमंडळाचा अपमान असल्याचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीकडून आहेर यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. त्यात आव्हाड यांची मुलगी व जावई यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर मारहाण केली होती. काँग्रेसचे शहराध्यक्ष चव्हाण यांनी देखील आपल्या कुटुंबियांना आहेर यांच्याकडून धोका असल्याचे सांगितले होते. यासंदर्भात अधिवेशनात चर्चा झाली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल. त्यांचा पदभार काढण्याचे आश्वासनही अधिवेशनात देण्यात आले होते.
पाठराखण का?
मुख्यमंत्री सांगतात फक्त एकच पदभार काढा, विधिमंडळाच्या कामकाजात झालेल्या चर्चेनंतर मुख्यमंत्र्यांनी त्यात हस्तक्षेप केला, असा आरोप आव्हाड यांनी केला. मुख्यमंत्री आहेर यांची इतकी पाठराखण का करत आहेत, असा सवालही त्यांनी ट्विटद्वारे केला आहे.