महेश गायकवाड यांना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, तब्बल २५ दिवसांनी प्रकृतीमध्ये सुधारणा
By जितेंद्र कालेकर | Published: February 26, 2024 07:30 PM2024-02-26T19:30:38+5:302024-02-26T19:31:22+5:30
रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम टेंभी नाक्यावरील आनंदआश्रममामध्ये कै. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
ठाणे: भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या गोळीबारामुळे गंभीर जखमी झालेले शिवसेनेचे कल्याण विभाग शहर प्रमुख आणि माजी नगरसेवक महेश गायकवाड यांना तब्बल २५दिवसांनी ज्युपिटर रुग्णालयातून सायंकाळी डिस्चार्ज मिळाला. त्यांची प्रकृती आता सुधारल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने सोमवारी दिली. रुग्णालयातून बाहेर पडल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम टेंभी नाक्यावरील आनंदआश्रममामध्ये कै. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे दर्शन घेतले.
उल्हासनगर हिल लाईन पोलिस ठाण्यात आमदार गायकवाड यांनी २ फेब्रुवारी २०२४ रोजी महेश गायकवाड आणि सहकारी राहुल पाटील यांच्यावर जमिनीच्या वादातून १० गोळ्या झाडल्या होत्या. त्यापैकी महेश यांच्यावर सहा गोळ्या तर राहुल पाटील यांच्यावर दोन गोळया झाडल्या होत्या. त्यामुळे दोघाना तातडीने उपचारासाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात हलविण्यात आले होते. महेश आणि राहुल यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह इतर नेते मंडळीही उपचारा दरम्यान भेटून गेले होते. त्यानंतर सोमवरी महेश यांना सांयकाळी ५ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला.
या दोघांच्याही समर्थनार्थ मोठ्या संख्येने कार्यकर्ते जमा झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवला होता. या प्रकरणामुळे आगामी काळात कल्याण -डोंबिवली मतदार संघात शिवसेना आणि भाजप असा सामना रंगण्याची चिन्हेही निर्माण झाल्याचे बोलले जात आहे.