महेश गायकवाड यांचे व्हेंटिलेटर काढले, खा. शिंदेंशी साधला संवाद
By जितेंद्र कालेकर | Published: February 5, 2024 08:56 PM2024-02-05T20:56:48+5:302024-02-05T20:57:14+5:30
सोशल मीडियावर तसा फोटोही व्हायरल झाला.
ठाणे : सहा गोळ्या लागून जखमी झालेले शिवसेना कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली असून, गायकवाड यांना आता व्हेंटिलेटरची गरज नाही. ते भेटीला आलेल्यांशी बोलत आहेत. कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी त्यांची रुग्णालयात भेट घेऊन संवाद साधला. सोशल मीडियावर तसा फोटोही व्हायरल झाला.
ठाण्यातील खासगी रुग्णालयाने दोन दिवसांपूर्वी शस्त्रक्रियेनंतर काढलेल्या वैद्यकीय बुलेटिनमध्ये महेश यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर ठेवले आहे. रविवारी ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी रुग्णालयात जाऊन डाॅक्टरांकडून महेश यांच्या प्रकृतीची माहिती घेतली.
पालकमंत्री देसाई यांना केवळ महेश यांना पाहता आले. त्यांच्याशी संवाद साधता आला नाही. त्यांची प्रकृती काळजी घेण्यासारखी असून, तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार शहाजी पाटील यांनाही त्यांच्याशी संवाद साधता आला नाही. मात्र, अवघ्या २४ तासांमध्येच सोमवारी सकाळी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल झाला. त्यामध्ये रविवारी खा. शिंदे यांनी महेश यांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केल्याचे म्हटले होते. फोटोत महेश हे खा. शिंदे यांच्याशी संवाद साधताना दिसत होते.