महेश पाटीलसह नऊ जणांवर ठपका, दोन हजार पानांचे दोषारोपपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 03:26 AM2018-03-17T03:26:23+5:302018-03-17T03:26:23+5:30
कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची ५० लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचेच नगरसेवक महेश पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची ५० लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचेच नगरसेवक महेश पाटील यांच्यासह एकूण नऊ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या नऊ जणांविरोधात ठाणे खंडणीविरोधी पथकाने नुकतेच कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. ते जवळपास दोन हजार पानी असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
भिवंडी तालुक्यातील कुडूस येथे एका दरोड्याच्या तपासात १३ डिसेंबरला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सहा जणांना अटक केली होती. या आरोपींनी तपासादरम्यान नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची सुपारी महेश पाटील यांनी दिल्याची कबुली दिली. त्यानुसार, याप्रकरणी ठाणे ग्रामीणच्या गणेशपुरी पोलीस ठाण्यात २१ डिसेंबरला महेश पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, तपासात हत्येचा कट डोंबिवलीत शिजल्याने हा गुन्हा शहर पोलिसांच्या मानपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर, याचा तपास ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला. दरम्यान, कल्याण जिल्हा सत्र न्यायालयाने महेश पाटील यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. त्याविरोधात मुंबई उच्च न्यायालयातही धाव घेतली होती. त्यावेळी न्यायालयाने शरणागती पत्करावी, असे आदेश दिले. त्यानंतर, त्याच्यासह तिघांनी १९ जानेवारी रोजी न्यायालयात शरणागती पत्करली होती. सध्या ते सर्व जण न्यायालयीन कोठडीत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
याप्रकरणी शहर पोलिसांनी कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात दाखल केलेल्या १,९३० पानी दोषारोपपत्रामध्ये आरोपींनी ज्या ठिकाणी कट रचला, त्याठिकाणचे लोकेशन्स, त्या ठिकाणचा पंचनामा आणि जप्त केलेला हत्येसाठी लागणारा शस्त्रसाठा याच्यासह आदी पुरावे दोषारोपपत्रात नमूद केल्याची माहिती पोलिसांनी दिली. याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.