महेश पाटील यांच्यावर ‘मोक्का’ची कारवाई?, मंत्र्याचा दबाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 03:10 AM2017-12-27T03:10:36+5:302017-12-27T03:10:38+5:30
ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची ५० लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना वाचविण्यासाठी भाजपाचा एक मंत्री दबावतंत्राचा वापर करीत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली.
ठाणे : कल्याण-डोंबिवली महापालिकेतील भाजपाचे सहयोगी नगरसेवक कुणाल पाटील यांच्या हत्येची ५० लाखांची सुपारी दिल्याप्रकरणी भाजपाचे नगरसेवक महेश पाटील यांना वाचविण्यासाठी भाजपाचा एक मंत्री दबावतंत्राचा वापर करीत असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिका-याने दिली. या प्रकरणातील आरोपींवर ‘मोक्का’खाली कारवाईची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान हे प्रकरण ग्रामीण पोलिसांकडून ठाणे शहर खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग झाल्यानंतर, याप्रकरणी अटकेतील आरोपींचा ताबा मिळावा, यासाठी ठाणे पोलिसांनी न्यायालयाला विनंती केली आहे. तर,नगरसेवक महेश पाटील यांच्याविरोधात मागील २० वर्षात एकूण १५ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भिवंडीनजिक कुडूस येथे एका दरोड्याचा तपास ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करीत होते.त्यांनी १३ डिसेंबरला भिवंडीतून कैलास घोडविंदे,राजू शेट्टी,अलुद्दीन शेख,विजय मेनबन्सी आणि सुजित नलावडे आदी सहा दरोडेखोरांना अटक केली.त्यांच्यापैकी विजय याने कुणाल यांच्या हत्येची सुपारी नगरसेवक महेश पाटील यांनी दिल्याचे उघड केले. पाटील यांच्याविरु द्ध गणेशपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या हत्येचा कट डोंबिवलीतच शिजला,तसेच त्यासाठी मारेकरी डोंबिवली परिसरात जमा झाले होते,असा तपशील आणि पुरावे हाती आल्याने ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.महेश पाटील यांच्या आदेशानुसार हे संपूर्ण प्रकरण मानपाडा पोलिसांकडे वर्ग केले. त्यानंतर हे प्रकरण तातडीने ठाणे खंडणी विरोधी पथकाकडे वर्ग झाले आहे. पाटील यांना वाचवण्यासाठी दबावतंत्र वापरले जात आहे.
>गुन्ह्यांची जंत्री
नगरसेवक महेश पाटील यांच्याविरोधात मागील २० वर्षात तब्बल १५ गुन्हे दाखल आहे. यामध्ये सर्वाधिक ६ गुन्हे मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल आहेत.त्यापाठोपाठ डोंबिवली-५, टिळकनगर, शिळा-डायघर, महात्मा फुले आणि लोणावळा या पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक-एक गुन्हा दाखल आहे. तसेच मानपाड्यात हत्येचे दोन तर डोंबिवलीत एक गुन्हा दाखल आहे. तर अपहरणप्रकरणी लोणावळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर खुनाचा प्रयत्न यासारखा व अन्य गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.