महेश आहेर धमकीबाबत सीआयडीमार्फत चौकशी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2019 12:43 AM2019-05-29T00:43:14+5:302019-05-29T00:43:18+5:30
ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना एका अनोळखीने फोनवरून ठार मारण्याची धमकी दिली आहे.
ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या मुंब्रा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना एका अनोळखीने फोनवरून ठार मारण्याची धमकी दिली आहे. ही धमकी अत्यंत गंभीर असून या प्रकरणाची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत (सीआयडी) चौकशी करण्याची मागणी विश्व दिव्यांग अत्याचार विरोधी मंच संचालित बृहन्महाराष्ट्र दिव्यांग विकास कामगार संघटनेचे मुख्य निमंत्रक मोहम्मद युसूफ खान यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
खान यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी पत्रव्यवहार केला असून मुख्यमंत्री कार्यालयाने हे निवेदन गृहखात्याकडे वर्ग केल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. दरम्यान, खान यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आहेर यांनी पदभार स्वीकारल्यानंतर मुंब्रा भागातील अनेक बेकायदा बांधकामांवर धडक कारवाई केली. त्यांच्या या कारवाईमुळे अनेक भूमाफियांना मोठा हादरा बसला. त्यामुळेच त्यांना ठार मारण्याचा कट आखण्यात आल्याचा आपल्याला संशय असल्याचेही त्यांनी यात म्हटले आहे. तसेच, गेल्या अनेक वर्षांपासून मुंब्रा येथे वाहतुकीस अडचण निर्माण होईल, यापद्धतीने फेरीवाल्यांनी ठाण मांडले होते. त्यांचे पुनर्वसन करून त्यांनी रस्ते मोकळे केले आहेत. त्यामुळे फेरीवाल्यांकडून ‘हप्तेखोरी’ करणाऱ्या गावगुंडांकडूनही आहेर यांच्यावर हल्ला होण्याची भीती आहे. या आधी येथील एक लिपीक अमीत गडकरी यांच्यावरही चॉपरने वार करण्यात आले होते. यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची सीआयडीमार्फत चौकशी करून या कटातील सर्व समाजकंटकांना जेरबंद करावे, अशी त्यांची मागणी आहे.
>काय आहे धमकीचे प्रकरण
समाजकंटकाकडून होणाºया विरोधानंतरही सहाय्यक आयुक्तांनी फेरीवाल्यांविरु द्ध कठोर कारवाई केली. या चांगल्या कामगिरीची पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दखल घेऊन आहेर यांचे विशेष कौतुकही केले. शुक्र वारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनीही त्यांचा सत्कार केला होता. मात्र, सोमवारी (२७ मे रोजी) सायंकाळी आहेर पालिका मुख्यालयात असताना त्यांना धमकीचा फोन आला. सैफ पठाण याच्याविरु द्ध केलेली तक्र ार मागे घे, अनधिकृत बांधकाम तोडू नको आणि मुंब्रा गुलाब मार्केट येथील फेरीवाल्यांवर कारवाई करू नको अन्यथा बघून घेण्याची धमकी या अनोळखी व्यक्तीने त्यांना दिली. धमकीनंतर आहेर यांनी तत्काळ नौपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन २७ मे रोजी तक्रार दाखल केली. धमकी देणाºयाचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.