महाराष्ट्रातील महिषासुराचे मर्दन होणारच - अंबादास दानवे
By अजित मांडके | Published: October 16, 2023 10:43 PM2023-10-16T22:43:35+5:302023-10-16T22:44:09+5:30
आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेभी नाक्यावरील नवरात्रोउत्सवाला दानवे यांनी हजेरी लावली.
ठाणे : सामान्य शिवसैनिक म्हणून मी ठाण्यात येऊन टेभी नाक्याच्या देवीचे दर्शन घेतले. देवी ही शक्तीची आणि ऊर्जेची देवी आहे, महिषासुराचे मर्दन करणारी आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात जे जे महिषासुर निर्माण झाले आहेत त्याचे मर्दन केल्याशिवाय देवी राहणार नाही. असा टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नाव न घेता राज्यातील सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या टेभी नाक्यावरील नवरात्रोउत्सवाला दानवे यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. यामध्ये त्यांनी आशिष शेलारांवर देखील टीका केली. आशिष शेलारांना इतिहास कमी माहिती असेल, आज एनडीएमध्ये कोणते कोणते पक्ष कोणत्या विचारांचे पक्ष सामील आहे हे सुद्धा त्यांनी जाहीर करावे. अटलजींनी जेव्हा सरकार स्थापन केले तेव्हा मुलायम सिंग होते, फर्नांडिस होते हे कोणत्या विचारांचे होते, मधू दंडवते होते ते कोणत्या विचारांचे होते . हे सर्व समाजवादी विचारांचे होते , आणि म्हणून आशिष शेलारांनी इतिहास तपासावा, भाजपला पराभूत करण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येतील असतील तर शेलारांच्या वक्तव्याचा फार विचार करण्याची गरज नसल्याचे दानवे म्हणाले.
मागील वर्षी वातावरण वेगळे होते. मात्र यावेळी दसरा मेळावा ऐतिहासिक होणार आहे. वाजत गाजत गुलाल उधळत शिवसैनिक येणार आहेत. आमच्यात कोणत्याही प्रकारचे गट नाहीत. खरी शिवसेना आमचीच असून बाकी ड्युब्लिकेट शिवसेना असल्याचा टोलाही त्यांनी शिंदे गटाला लगावला. आमचा एक नेता, एक झेंडा एक मैदान असल्याचेही दानवे यांनी यावेळी स्पष्ट केले.
आरक्षणाची आम्हीही वाट बघत आहोत
मराठ्यांना आरक्षण देण्याचे आश्वासन स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे पाटलांना दिले आहे. मी सुद्धा मराठवाड्यातील आहे. मला या आश्वासनांची चांगली माहिती आहे . आम्ही मराठवाड्यातील लोक या आश्वासनाच्या पूर्ततेची वाट बघत असल्याचे दानवे यावेळी म्हणाले. आझाद मैदानावर शिंदे गटाचा मेळावा होत असल्याचे प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी अंबादास दानवे यांच्या निदर्शनास आणून देताच ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना हीच ओरिजनल आहे. आझाद मैदानावर जमणारे ते डुप्लिकेट लोक असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.