Maharashtra Election 2019: विजयाची हॅटट्रिक साधणार की हुकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2019 01:33 AM2019-10-24T01:33:17+5:302019-10-24T06:09:38+5:30
Maharashtra Election 2019: बंडखोरीमुळे प्रतिष्ठा पणाला ;कल्याण पूर्वेत मतदारांचा कौल कोणाला?
- प्रशांत माने
कल्याण : एकीकडे झालेली बंडखोरी आणि दुसरीकडे घटलेला मतदानाचा टक्का पाहता कल्याण पूर्व मतदारसंघात मतदारांचा कौल कोणाला, हे गुरुवारी मतमोजणीच्या दिवशी स्पष्ट होणार आहे. हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला जात असला तरी मागील दोन्ही विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून गणपत गायकवाड हे निवडून आले आहेत. यंदा गायकवाड हे भाजपचे उमेदवार म्हणून रिंगणात आहे. तर, त्यांच्याविरोधात शिवसेनेचे बंडखोर धनंजय बोडारे हे अपक्ष म्हणून उभे ठाकले आहेत. यात दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली असून, यात गायकवाड हे विजयाची हॅट्ट्रिक साधणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
कल्याण पूर्व मतदारसंघात १९ उमेदवार उभे ठाकले आहेत. यातील ११ उमेदवार अपक्ष आहेत. परंतु, भाजपचे उमेदवार गणपत गायकवाड आणि अपक्ष उमेदवार धनंजय बोडारे या दोघांमध्येच चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीकडून प्रकाश तरे तर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार अश्विनी थोरात-धुमाळ रिंगणात आहेत.
एप्रिल-मे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत या पूर्व मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ८९ हजार २६९ मते मिळाली होती. तर, राष्ट्रवादीचे उमेदवार बाबाजी पाटील यांनी २७ हजार ५५५ मते मिळवली होती. तर, पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढविणाऱ्या वंचित आघाडीनेही चांगली मते मिळविली होती. त्यांचे उमेदवार संजय हेडावू यांना १७ हजार ९९७ मते मिळाली होती. त्यामुळे गुरुवारी होणाºया मतमोजणीदरम्यान कोणाच्या पारड्यात किती मते पडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
दरम्यान, यंदा मतदानाची टक्केवारी घटली आहे. मागील निवडणुकीत मतांची टक्केवारी ४५.१९ इतकी होती. परंतु, यंदा ४३.५५ टक्के मतदान झाले आहे. बंडखोरीमुळे चुरशीची लढाई झालेल्या या मतदारसंघात कोणत्या उमेदवाराला किती मते पडतात, हे गुरुवारी मतमोजणीनंतर स्पष्ट होईल.
मताधिक्याकडे लक्ष
मागील दोन विधानसभा निवडणुकांत दोन्ही वेळेला अपक्ष निवडणूक लढविणारे गायकवाड हे विजयी झाले आहेत. २००९ मध्ये ते २४ हजार ४७६ मताधिक्याने निवडून आले. मात्र, २०१४ मध्ये त्यांना अवघे ७४५ मताधिक्य मिळाले होते.
‘जिथे सत्ता त्याला पाठिंबा’ हे समीकरण त्यांनी दोन्ही वेळेस ठेवले होते. परंतु, आता ते भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात असले तरी त्यांच्यासमोर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार बोडारे यांचे आव्हान आहे.