सहा लाखांचे हिरेजडीत दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 10:33 PM2019-06-10T22:33:00+5:302019-06-10T22:57:15+5:30

वागळे इस्टेट येथील ज्या घरात काम केले त्याच घराच्या लॉकची चावी मिळवून सहा लाख ८५ हजारांच्या ऐवजाची चोरी करणा-या मिन्नती गौडा या मोलकरणीला वागळे इस्टेट पोलिसांनी मोठया कौशल्याने अटक केली. तिच्याकडून हा सर्व ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Maid arrested for theft of Six lakh diamonds jewelery | सहा लाखांचे हिरेजडीत दागिने लंपास करणाऱ्या मोलकरणीला अटक

ओरिसाला पळून जाण्याच्या होती बेतात

Next
ठळक मुद्देओरिसाला पळून जाण्याच्या होती बेतातमुलाने चोरीतील घडयाळ घातल्याने तपासाला मिळाली दिशावागळे इस्टेट पोलिसांनी लावला छडा

ठाणे: आपल्याच मालकाच्या घरातील सहा लाख ८५ हजारांचे हिरेजडीत दागिने चोरुन ओरिसाला पळून जाण्याच्या बेतात असलेल्या मिन्नती दुर्योधन गौडा (३१, रा. ओम अयोध्या चाळ, लोकमान्यनगर, पाडा क्र मांक तीन, ठाणे) हिला वागळे इस्टेट पोलिसांनी २४ तासांमध्येच अटक केली. तिच्याकडून चोरीतील सर्वच्या सर्व सहा लाख ८५ हजारांचा ऐवज हस्तगत केल्याची माहिती वागळे इस्टेट विभागाचे सहायक पोलीस आयुक्त प्रकाश निलेवाड यांनी दिली.
वागळे इस्टेट येथील रोड क्र मांक १६ येथील रहिवाशी भावेश मिर्गनानी (३७) यांच्या घरातून अज्ञात चोरटयांनी सोन्याच्या आणि हिऱ्यांच्या दागिन्यांसह सुमारे सहा लाख ८५ हजारांचा ऐवज चोरी झाल्याची घटना १ ते ३ जून दरम्यान घडली होती. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात ६ जून रोजी मिर्गनानी यांनी गुन्हा दाखल केला होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिकेत पोटे यांचे पथक या घटनेचा तपास करीत असतांनाच पोलिसांनी भावेश यांच्या इमारतीचे सीसीटीव्ही चित्रणाची पडताळणी केली. त्यात एक महिला भावेश यांच्या घरातून चोरी करुन जात असल्याचे आढळले. हीच महिला पूर्वी त्यांच्या घरात कामाला होती, अशीही माहिती समोर आली. तिचा कोणताही पत्ता उपलब्ध नसतांना तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे लोकमान्यनगर पाडा क्रमांक तीन येथील या महिलेचा पोलिसांनी शोध घेतला. त्यावेळी तिच्या घराच्या बाहेर खेळत असलेल्या तिच्या १२ वर्षांच्या मुलाच्या हातात परदेशी बनावटीचे महागडे घडयाळ उपनिरीक्षक पोटे यांच्या पथकाला दिसले. त्यानंतर तिच्या घरात हे पथक दाखल झाले त्यावेळी ती सामानाची आवराआवर करुन ओरिसाला पळून जाण्याच्या बेतात असल्याचे उघड झाले. महिला पोलिसांच्या मदतीने मिन्नती गौडा हिची कसून चौकशी केली असता, तिने चोरीची कबूली दिली. त्यानंतर एका बॅगेतून हिरेजडीत दागिने आणि सर्व सहा लाख ८५ हजारांचा ऐवजही पोलिसांना काढून दिला. तिला या प्रकरणात ७ जून रोजी अटक करण्यात आली. ठाणे न्यायालयाने तिला चार दिवसांची पोलीस कोठडी दिली.
अशी केली चोरी
भावेश मिर्गनानी यांच्याकडे घरकाम करणारी मिन्नती हिने त्यांच्या घराच्या कुलपाची चावी काही दिवसांपूर्वीच मिळवली होती. १ ते ३ जून या काळात ते पत्नीसह गावी गेले होते. तर सासरे रुग्णालयात दाखल असल्यामुळे घरी असलेली त्यांची सासू २ जून रोजी सकाळी १० ते १०.४० वा. च्या दरम्यान रुग्णालयात गेली. याच अवघ्या ४० मिनिटांच्या काळात तिने आधीच मिळवलेल्या चावीच्या आधारे त्यांच्या घरात डल्ला मारला. दरम्यान, १ जून रोजीच गावी जाणार असल्यामुळे यापुढे आपण कामाला येणार नसल्याचे तिने सांगितले होते. पण, २ जून रोजी ती इमारतीमधील सीसीटीव्हीमध्ये दिसल्यामुळे तिच्यावरच संशय बळावला. चौकशीत तिनेच चोरी केल्याचे उघड झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अफजल पठाण यांनी सांगितले.

Web Title: Maid arrested for theft of Six lakh diamonds jewelery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.