मॅडम, फिर आऊ क्या काम करने?; पैसे नसल्याने घरकाम करणाऱ्या महिलांची उपासमार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2020 12:42 AM2020-04-25T00:42:19+5:302020-04-25T00:43:07+5:30

जीवावर उदार होऊन महिलांची घरकामावर जायची तयारी

maids are suffering due to lack of word amid coronavirus lockdown | मॅडम, फिर आऊ क्या काम करने?; पैसे नसल्याने घरकाम करणाऱ्या महिलांची उपासमार

मॅडम, फिर आऊ क्या काम करने?; पैसे नसल्याने घरकाम करणाऱ्या महिलांची उपासमार

Next

- स्नेहा पावसकर 

ठाणे : मॅडम, फिर आऊ क्याँ काम करने? काम की जरूरत है... असे फोन हल्ली करत आहेत, त्या घरकामगार महिला. पहिल्या लॉकडाउननंतर घरकामे बंद होऊन महिना लोटला. परिणामी, रोजगार बुडाल्याने उपासमारीची वेळ आलेल्या घरकामगार महिला आता कोरोनाची भीती असली, तरी जीवावर उदार होऊन पोटासाठी काम करायला घराबाहेर पडण्याची तयारी दाखवत आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाला घरीच राहण्याचे आवाहन केले जात आहे. पहिला लॉकडाउन जाहीर करून एक महिना होऊन गेला. तेव्हापासून घरकाम करणाऱ्या महिलांना काम बंद करावे लागले होते. मात्र, आता लॉकडाउनही वाढवला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व कामे अद्यापही बंद आहेत. हे काम महिनाभर बंद असल्याने हातावर पोट असलेल्या अन्य कामगारांप्रमाणे घरकामगार महिलांचेही हाल झाले आहेत. मार्च महिन्यातील अर्धे दिवस काम करूनही लॉकडाउनमुळे त्यांना पगार मिळालेला नाही, तर जवळपास संपूर्ण एप्रिल महिना त्यांना घरीच थांबावे लागल्याने या महिन्याचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे आता घर कसे चालवायचे, हाताशी थोडीफार जमापुंजी असली तरी ती आता खर्च केली, तर येणाºया दिवसांत कशी गुजराण करायची, असे एक ना अनेक प्रश्न त्यांच्यासमोर उभे आहेत. त्यामुळे आता कोरोनाची भीती दूर ठेवत पोटासाठी या घरकामगार महिला घराबाहेर पडून पुन्हा दोन घरची धुणीभांडी, जेवण करण्याची तयारी दाखवत आहेत. अनेक जणींनी काम करत असलेल्या मालकांना फोन करून काम करने आऊ क्याँ मॅडम, घर मे पैसे की जरूरत है..., काम चाहिये असे विचारू लागल्या आहेत. मात्र, आता अनेक सोसायट्यांनी बाहेरील व्यक्तींना सोसायटीत प्रवेश बंद केल्याने सध्या तरी त्यांना कामावर येऊ नका, असेच मालकांकडून सांगितले जात आहे.

ठाणे शहरात नोंदणीकृत हजार-दीड हजार घरकामगार महिला आहेत. यापैकी केवळ पाच टक्के महिलांनाच मालकांनी पगार किंवा मदत म्हणून पैसे बँकेत पाठवून त्यांची सोय केली आहे. उर्वरित महिलांना पैसे देणे तर सोडा, साधी विचारपूसही केलेली नाही, अशी माहिती काहींनी दिली. वाईट परिस्थिती असलेल्या घरकामगार महिलांसाठी नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स मूव्हमेंट या संघटनेतर्फेही मदतीचा हात म्हणून जीवनावश्यक वस्तू देण्यात येत आहेत.

लॉकडाउननंतर रोजगार बंद झाल्याने अनेक घरकामगार महिलांची उपासमार सुरू आहे. त्यामुळे आता जीवाची पर्वा न करता पोटासाठी त्या पुन्हा काम करू इच्छित आहेत. मात्र, आता कोरोनाच्या भीतीने त्यांना इतक्यात सोसायटीत प्रवेश दिला जाणार नाही. आम्ही संस्थेतर्फे सर्व महिलांना टप्प्याटप्प्याने जीवनावश्यक वस्तू पुरवणार आहोत. मात्र, ही मदत तुटपुंजीच आहे. त्यामुळे त्यांना शासनाकडूनही मदत होण्याची गरज आहे.
- रेखा जाधव, ठाणे जिल्हा समन्वयक, नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स मूव्हमेंट लि.

Web Title: maids are suffering due to lack of word amid coronavirus lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.