Photo: नव्या ठाणे स्थानकात मेल, लोकल, बस, रिक्षा, टॅक्सीसह हेलिकॉप्टरलाही मिळणार थांबा

By नारायण जाधव | Published: June 21, 2023 05:47 PM2023-06-21T17:47:28+5:302023-06-21T17:49:07+5:30

१७ सरकते जिने, तीन सरकते रस्त्यांसह २० लिफ्टची सोय : फेरीवाल्यांसाठी खास हॉकर्स झोन

Mail, local, bus, rickshaw, taxi along with helicopter will get a stop at new Thane Railway station | Photo: नव्या ठाणे स्थानकात मेल, लोकल, बस, रिक्षा, टॅक्सीसह हेलिकॉप्टरलाही मिळणार थांबा

Photo: नव्या ठाणे स्थानकात मेल, लोकल, बस, रिक्षा, टॅक्सीसह हेलिकॉप्टरलाही मिळणार थांबा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : ‘आठशे खिडक्या नऊशे दारं’ या शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमातील लोकप्रिय गाण्याची आठवण लवकरच नवे विस्तारीत बहुउद्देशीय ठाणेरेल्वेस्थानक करून देणार आहे. या नव्या स्थानकाच्या भव्य इमारतींच्या संकल्पचित्राचे आराखडे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यानुसार सध्या ठाणे स्थानकातून रोज होणारी साडेदहा लाखांहून प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन नव्या स्थानकात चार इमारती, नऊ भव्य प्रवेशद्वारे राहणार असून विमानतळाप्रमाणे तीन ट्रॅव्हेलेटर अर्थात सरकते रस्ते, १७ सरकते जिने, २० लिफ्टसह आपत्कालिन परिस्थितीत प्रवाशांना एअरलिफ्ट देण्यासाठी हेलिपॅडची व्यवस्था राहणार आहे. मेल, एक्सप्रेससह लोकलप्रमाणे हेलिकॅाप्टरला थांबा मिळणारे बहुधा हे राज्यातील पहिलेच स्थानक राहणार आहे.

रेल्वे आणि मनोरुग्णालयाची १४.३ एकर अशा २७ एकर जागेवर हे विस्तीर्ण स्थानक उभे राहणार आहे. रेल्वे आणि ठाणे महापालिकेच्या संयुक्त भागीदारीतून हे स्थानक बांधण्यात येणार आहे. या ठिकाणी १६ ते २५ माळ्यांच्या चार इमारती, १२ फलाट, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालये, रेस्टॅारंट, मेडिकल स्टोअर, दुकाने, रेल्वेची कार्यालये, कर्मचारी वसाहती राहणार आहेत. याशिवाय फेरीवाल्यांसाठी खास हॉकर्स प्लाझाची सोय केली असून त्यात सध्या असलेल्या नोंदणीकृत फेरीवाल्यांना सामावून घेण्यात येणार आहे.

याशिवाय स्थानकाच्या आवारात रिक्षा, टॅक्सी स्टँडसह टीएमटी, बेस्ट, एनएमएमटीच्या बसची ये-जा करण्यासाठी खास सोय करण्यात येणार आहे. याशिवाय दीड हजार दुचाकी आणि चारशे चारचाकी वाहनांची पार्किंगची सोय राहणार आहे.

२.२५ किमी लांबीचा सरकता रस्ता
स्थानकांतील सर्व फलाट आणि १७ सरकत्या जिन्यांना जोडणारा २.२५ किमी लांबीचा सरकता रस्ता ही या स्थानकाची खास ओळख राहणार आहे. याचा आजारी व्यक्ती, अपंग, वयोवृद्धांसह लहान मुले, गरोदर महिला यांची पायपीट थांबून स्थानकातील इच्छित स्थळी आपोआप जाता येणार असल्याचा लाभ होणार आहे.

एअरलिफ्टची सोय
अपघात, भूकंप वा अन्य आपत्कालिन परिस्थितीत नागरिक, प्रवाशांना एअरलिफ्ट देण्यासाठी हेलिपॅडची व्यवस्था राहणार आहे. पश्चिमेतील स्थलांतरित रेल्वे वसाहतींची जागा किंवा पूर्वेतील सॅटिस परिसर याठिकाणी हे हेलिपॅड उभारण्याचे नियोजन आहे. जेणेकरून आपत्कालिन परिस्थितीत एअरलिफ्ट करून वैद्यकीय वा अन्य मदत करता येणे सोपे होईल.

ठाणे-मुलुंड स्थानकावरील भार कमी होणार
नवे विस्तारीत बहुउद्देशीय ठाणे रेल्वेस्थानकाचे बांधकाम पूर्ण होऊन ते कार्यान्वित झाल्यानंतर ठाणे आणि मुलुंड या दोन स्थानकांवरील प्रवाशांचा भार मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. यात मुलुंडचे २५ ते ठाण्यातील ३५ टक्के प्रवासी नव्या स्थानकाकडे वळतील, असा अंदाज आहे.

रस्ते घेणार मोकळा श्वास
सध्या ठाणे स्थानकातून एक हजारच्यावर रेल्वेगाड्या धावत असून त्यातून साडेदहा लाखांवर प्रवासी ये-जा करतात. यामुळे केवळ रेल्वेस्थानकच नव्हे तर जुन्या स्थानकांच्या बाहेरील रिक्षा, टॅक्सी, बस, खासगी वाहने यांचीही वर्दळ कमी होऊन तेथील रस्ते मोकळा श्वास घेऊ शकतील.

Web Title: Mail, local, bus, rickshaw, taxi along with helicopter will get a stop at new Thane Railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.