वाहनांमुळे की बांधकामुळे कशामुळे वाढतेय प्रदुषण; ठाणे महापालिका गोळा करतेय मातीचे नमुने
By अजित मांडके | Published: January 8, 2024 04:32 PM2024-01-08T16:32:01+5:302024-01-08T16:33:26+5:30
ठाण्यात प्रदुषण नेमके कोणत्या गोष्टीमुळे होत आहे, कोणत्या भागात सर्वाधिक धुळ प्रदुषण वाढत आहे.
अजित मांडके, ठाणे : ठाण्यात प्रदुषण नेमके कोणत्या गोष्टीमुळे होत आहे, कोणत्या भागात सर्वाधिक धुळ प्रदुषण वाढत आहे, याचा अभ्यास आता ठाणे महापालिकेच्या प्रदुषण विभागाने सुरु केला आहे. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीच्या निर्देशानुसार ठाणे महापालिकेने मागील काही दिवसापासून हे काम सुरु केले आहे. यात धुळ व हवा प्रदुषण असलेले रस्ते आणि त्या परिसरात सुरु बांधकामांच्या ठिकाणी असलेली मातीचे नमुने गोळा करत आहे. त्यातून नेमके प्रदुषण कुठुन अधिक होत आहे, याचा अभ्यास केला जाणार आहे. त्यानंतर समिती त्याठिकाणी कशा उपाय योजना करता येणे गरजेचे आहे. याचे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.
ठाण्यासह एकूणच एमएमआर क्षेत्रात मागील काही महिन्यांपासून प्रदुषणात वाढ होत आहे, हे प्रदुषण रोखण्यासाठी विविध महापालिकांच्या माध्यमातून उपाय योजना केल्या जात आहे. साफसफाई करण्याबरोबर रस्ते धुलाई, बांधकामांच्या ठिकाणी काळजी आदींसह इतर उपाय केले जात आहेत. परंतु अद्यापही प्रदुषण म्हणावे तितके कमी झालेले नाही. असे असले तरी शहरातील काही रस्त्यांच्याकडेला सातत्याने धुळ जमा होत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी तरंगत्या धुलीकणांचे प्रमाणही अधिक आहे. दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने नुकतेच हे प्रदुषण नेमके कशामुळे होते, याचा शोध घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यासाठी धुळ प्रदुषित रस्त्याकडेची आणि परिसरातील बांधकामांच्या ठिकाणांची माती गोळा करण्याच्या सुचना समितीने दिल्या असून त्यानुसार पालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाच्या पथकाने सर्वाधिक हवा प्रदुषित रस्त्यांचा शोध घेऊन तेथील माती गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. त्याचबरोबर तेथील हवेतील तरंगत्या धुलीकणाचे मोजमाप यंत्रणाच्या साहाय्याने केले जात असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.
रस्ते आणि परिसरातील बांधकामाच्या ठिकाणची माती घेऊन त्याचे परिक्षण केले जाणार आहे. त्यात बांधकाम ठिकाणची माती रस्त्याकडेला जमा होते का किंवा वाहनांच्या चाकांना लागून येणारी माती रस्त्याकडेला जमा होते का याचा शोध घेतला जाणार आहे. त्याचबरोबर हवेतील तरंगते धुळीकण वाढण्याची कारणे काय आहेत आणि त्याठिकाणी कोणत्या उपाययोजना करणे अपेक्षित आहेत, याचाही अभ्यास केला जाणार आहे. उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीमध्ये आयआयटी आणि निरी संस्थेचे प्रतिनिधी आहेत. पालिकेकडून सादर होणाºया अहवालाच्या आधारे समितीचे सदस्य पालिकेला काही उपाययोजना सुचविणार असल्याची माहिती महापालिका सुत्रांनी दिली.