हवेची गुणवत्ता राखा, अन्यथा कारवाईला सामोरे जा; फटाक्यांसाठी वेळेची मर्यादा

By अजित मांडके | Published: November 7, 2023 06:49 PM2023-11-07T18:49:23+5:302023-11-07T18:50:11+5:30

प्रभाग समिती स्तरावर सहाय्यक आयुक्तांवर जबबादारी

Maintain air quality or face action; Time limit for fireworks, Abhijeet Bangar in thane | हवेची गुणवत्ता राखा, अन्यथा कारवाईला सामोरे जा; फटाक्यांसाठी वेळेची मर्यादा

हवेची गुणवत्ता राखा, अन्यथा कारवाईला सामोरे जा; फटाक्यांसाठी वेळेची मर्यादा

ठाणे : मुंबईच्या तुलनेत ठाण्यातील हवेची गुणवत्ता चांगली असली तरी देखील प्रदुषण वाढू नये आणि हवेची गुणवत्ता राखण्यासाठी ठाणे महापालिकेने मार्गदर्शक तत्वे जारी  केली आहेत. त्यानुसार अनाधिकृत बांधकामे रोखण्याबरोबर, भरारी पथकाची स्थापना, रस्त्यावरची धूळ, बांधकामाच्या ठिकाणी उडणारा धुराळा, वाहनांमुळे होणारे प्रदुषण, बांधकाम साहित्याची वाहतूक या सर्व गोष्टींकडे लक्ष देण्याच्या सुचना महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिल्या आहेत. त्यासाठी प्रभाग स्तरावर सहाय्यक आयुक्तांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दिवाळीच्या काळात सांयकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत फटाके फोडावेत असेही सांगण्यात आले आहे.  त्यातही थंडी वाजली तरी शेकोट्या पेटवू नका असेही पालिकेने स्पष्ट केले. रस्त्यावरची धूळ, बांधकाम स्थळी उडणारा धूरळा, वाहनांमुळे होणारे प्रदूषण, बांधकाम साहित्याची वाहतूक या सर्व गोष्टींकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवावे, त्यासाठी कृती दल तयार करण्यात यावे, असे आयुक्तांनी सांगितले. स्मशानभूमीवर विद्युत दाहिनी किंवा गॅस शव दाहिनीचा वापर प्राधान्याने होईल यासाठी प्रयत्न करावा असेही त्यांनी सांगितले.

भरारी पथकांची नेमणूक
हवेची गुणवत्ता खालावण्यास कारणीभूत असलेले घटक निश्चित करून त्यावर निर्बंध आणण्यासाठी भरारी पथकांची नियुक्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले. प्रत्येक लहान मोठ्या बांधकाम साईटची पथकामार्फत पाहणी करून त्यांच्याकडून मार्गदर्शक तत्वांच्या पालनाची लेखी हमी घेण्याची जबाबदारी शहर विकास विभागांवर देण्यात आली आहे.

रस्ते, गटार, फूटपाथ आदींच्या बांधकाम कामांवर, रस्त्यांची दुरुस्ती, धूळमुक्ती आदींबाबत पाहणी आणि कारवाई करण्याची जबाबदारी शहर अभियंता यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागावर देण्यात आली आहे. शहरात किंवा शहराबाहेरून होणारी डेब्रिज वाहतूक रोखणे, उघड्यावर कोणताही कचरा जाळला जाणार नाही, शेकोट्या पेटवल्या जाणार नाहीत, याची जबाबदारी सहाय्यक आयुक्तांवर देण्यात आली आहे. पोलीस मुख्यालय, नाशिक रोड, वागळे इस्टेट आदी भागात डेब्रिज रस्त्यांच्या कडेला टाकण्याचे प्रमाण जास्त आहे. अशा सर्व ठिकाणी कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. संबंधित सर्व विभाग, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांनी दैनंदिन कारवाईचा अहवाल पर्यावरण विभागास यांना सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्यात, पथकाच्या फेऱ्या, पाहणीची ठिकाणे, आढळलेली निरिक्षणे, करण्यात आलेली कारवाई यांचा तपशील समाविष्ट असणार आहे.

चेकनाक्यांवर कायम स्वरुपी पथक
शहराच्या बाहेरून रॅबिट, डेब्रिज ठाण्यात आणून ते रस्त्यांच्या कडेला टाकले जाते. त्यामुळे त्यावर निर्बंध येण्यासाठी आनंदनगर, मॉडेला चेक नाका येथे पुढील काही दिवस कायमस्वरुपी पथक तैनात करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. रात्रीच्या वेळी डेब्रिज टाकण्याचे प्रकार घडतात, त्यामुळे सगळ्यांनी दक्षता घेऊन त्यास पायबंद घालावा असे त्यांनी सांगितले.

अनधिकृत बांधकामे थांबवा
प्रभाग समिती क्षेत्रातील अधिकृत बांधकामांनी निर्बंधांचे पालन करावे, यासाठी सगळ्यांनी सर्तक राहवे. तसेच, अनधिकृत बांधकामे पूर्णपणे थांबतील, याची खबरदारी सहाय्यक आयुक्तांनी घ्यावी. अनधिकृत बांधकामांबाबत वेळोवेळी झालेल्या चर्चेनुसार कारवाई करण्यात यावी.
शालेय विद्यार्थ्यांमध्ये जागृती
फटाक्यांमुळे होणारे दुष्परिणाम, प्रदूषण याबद्दल शालेय विद्यार्थ्यांना जागृत करण्यात यावे. त्यांच्यामार्फत हा संदेश सगळीकडे जावा, असे मा. उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यानुसार, शिक्षण विभागाने महापालिका तसेच, खाजगी शाळांतील विद्यार्थ्यांना फटाक्यांविषयी जागृत करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

हवेची पातळी दर्शवणारी यंत्रणा
सध्या ठाणे शहरात महापालिकेची तीन आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाची दोन अशी पाच प्रदूषण नोंद केंद्रे आहेत. त्याबरोबरीने प्रत्येक दहा ते वीस चौरस मीटर क्षेत्रासाठी एक प्रदूषण नोंद स्वयंचलित यंत्र बसवण्याची प्रक्रिया सुरू करावी, त्याची माहिती लगेचच सोबतच्या इलेक्ट्रॉनिक फलकावर दर्शविण्यात यावी, म्हणजे नागरिकांमध्येही त्याबद्दल जागरुकता वाढेल. हवेची गुणवत्ता अचूक मोजून ती नागरिकांना दाखवता आली पाहिजे. तसेच, माजिवडा आणि विटावा येथे स्मॉग मशीन बसविण्यात आली आहेत. त्यापैकी विटावा येथील मशीन सुरू असून माजिवडा येथील मशीन तत्काळ सुरू करावे, असे बांगर यांनी पर्यावरण विभागास सांगितले.

मुंबई महापालिकेचे हवेची गुणवत्ता राखण्यासाठी विस्तृत धोरण मार्च २०२३ मध्ये तयार केले आहे. ते ठाणे महापालिकेने स्वीकारून तत्काळ लागू करण्यात यावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या. हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी काय करायला हवे आणि काय टाळायचे याची माहिती देणारी पोस्टर्स सर्व गृहनिर्माण सोसायट्यांच्या प्रवेश लॉबीवर लावण्यात यावीत. मेट्रोच्या बांधकाम ठिकाणी घ्यायच्या काळजीबद्दल मेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तत्काळ अवगत करून त्याचा दैनंदिन पाठपुरावा करावा. तसेच, एमआयडीसीलाही औद्योगिक क्षेत्र आणि कंपन्यांमधील घ्यायच्या काळजीबाबत अवगत करण्यात यावे, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले

Web Title: Maintain air quality or face action; Time limit for fireworks, Abhijeet Bangar in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.