पत्रकारितेचा वसा श्वासाइतका सांभाळा
By admin | Published: January 4, 2016 01:55 AM2016-01-04T01:55:26+5:302016-01-04T01:55:26+5:30
‘डोळस माणसाला उजेड दाखिवते ती पत्रकारिता आणि हा वसा श्वासाइतकाच सांभाळावा लागतो’, असे सांगून बायलाईन प्रमाणेच आपली ‘लाईफ लाईन’ अखंड असावी,
ठाणे : ‘डोळस माणसाला उजेड दाखिवते ती पत्रकारिता आणि हा वसा श्वासाइतकाच सांभाळावा लागतो’, असे सांगून बायलाईन प्रमाणेच आपली ‘लाईफ लाईन’ अखंड असावी, अशी अपेक्षा कवी अशोक बागवे यांनी व्यक्त केली.
सिध्दी फ्रेण्ड्स पब्लिकेशनतर्फे साहित्यिक विनोद पितळे यांच्या ‘बायलाईन व आयटम’ या कोळीगीतांच्या आॅडिओ सीडीचे प्रकाशनावेळी नरेंद्र बल्लाळ सभागृहात ते बागवे बोलत होते. यावेळी अक्षर सिध्दी नववर्ष अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी बागवे यांनी पत्रकार हे खुप क्रिएटिव्ह असतात; परंतु कारंज्याला जसे कुंपण असते तसेच पत्रकाराला वेळेची, शब्दांची मर्यादा असते. त्यामुळे एखाद्या कलाकाराप्रमाणे त्याला चिंतन करता येत नसल्याचे सांगून पत्रकाराला प्रतिभा आणि प्रज्ञा म्हणजेच बुद्धीचा वापर एकाचवे ळी करता येतो. याचे कौतुक आम्हा कलाकरांना वाटते, असेही बागवे यांनी नमूद केले.
कुसुमाग्रज हे देखील पत्रकार होते आणि ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ हे गाणे रात्रपाळीची पत्रकारिता करताना सुचले होते, ही आठवण त्यांनी सांगितली. मुंबई पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी नवीन पत्रकारांनी अवतीभवती चौकसपणे बघावे आणि संतासारखे वागू नये, असा सल्ला दिला.
यावेळी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी पर्यावरणाचा व्हास होऊ नये यासाठी सरकारकडे प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. तसेच महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीला कसाब भारतात येणार असल्याचे चार दिवसापूर्वीच कळले होते आणि तसे निरोपही तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना देण्यात आले होते. तरीही याकडे दुर्लक्ष केले असा गौप्यस्फोट केला. तसेच कोळी समाज मुंबईतून हद्दपार झाला तर मुंबई उद्ध्वस्त होईल अशी भीती व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय पितळे, संगीतकार मंगेश राऊळ आदी मान्यवर उपस्थित होते.