मैत्रेयच्या आतापर्यंत ५० कोटींच्या ७८ मालमत्ता जप्त

By जितेंद्र कालेकर | Published: November 13, 2018 11:09 PM2018-11-13T23:09:16+5:302018-11-13T23:13:47+5:30

अल्प मुदतीमध्ये जादा व्याजाचे तसेच भूखंड देण्याचे अमिष दाखवित हजारो लोकांना गंडा घालणाऱ्या मैत्रेय चिट फंड ग्रृपच्या आतापर्यंत ५० कोटींच्या ७८ मालमत्ता ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत.

Maitreya has so far confiscated 78 assets worth Rs. 50 crore | मैत्रेयच्या आतापर्यंत ५० कोटींच्या ७८ मालमत्ता जप्त

ठाणे जिल्ह्यातील ६ हजार ३१० गुंतवणूकदारांना दिलासा

Next
ठळक मुद्दे१७ कोटींची फसवणूकठाणे जिल्ह्यातील ६ हजार ३१० गुंतवणूकदारांना दिलासासहापैकी दोघे अटकेत

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : मुदतठेवीवर जमीन किंवा दुप्पट पैसे देण्याचे प्रलोभन दाखवून सुमारे १७ कोटींची फसवणूक करणा-या ‘मैत्रेय गु्रप’च्या सुमारे ५० कोटींच्या ७८ मालमत्ता जप्त केल्याची माहिती ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेने दिली आहे. याच मालमत्ताच्या लिलावातून सहा हजार ३१० गुंतवणूकदारांचे पैसेही दिले जाणार असल्यामुळे त्यांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड, डोंबिवली, कर्जत आणि ठाणे शहरातील हजारो गुंतवणूकदारांनी मैत्रेय गृपमध्ये आपली गुंतवणूक केली होती. काही ठराविक रक्कम गुंतविल्यानंतर दोन ते पाच वर्षामध्ये दुप्पट रक्कम किंवा मध्यप्रदेश तसेच उत्तरप्रदेशात मोठी जमीन देण्याचे अमिष त्यांना दाखविले होते. पण, कालांतराने पैसे किंवा जमीन असे काहीच न मिळाल्याने मैत्रेयविरुद्ध २०१६ पासून गुन्हे दाखल होण्यास सुरुवात झाली. ठाण्यातील कळव्यामध्येही एका महिलेने आॅक्टोबर २०१७ मध्ये कळवा पोलीस ठाण्यात फसवणुकीची तक्रार दाखल केली. त्यापाठोपाठ शेकडो तक्रारी दाखल झाल्या. अशा सहा हजार ३१० गुंतवणूकदारांची सुमारे १७ कोटींची फसवणूक झाल्याचे समोर आले. राज्यभरात याप्रकरणी आतापर्यंत ३० गुन्हे दाखल झाले असून अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रभातकुमार यांच्या अधिपत्याखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
ठाणे आर्थिक गुन्हे शाखेने याप्रकरणी सहापैकी लक्ष्मीकांत नार्वेकर (४५) आणि विजयशंकर तावरे (४५) या दोन आरोपींना अटक केली आहे. तर मुख्य सूत्रधार वर्षा सत्पाळकर हिच्यावर लूकआऊट नोटीस जारी केली आहे. मुंबईतून मंगळवारी (१३ नोव्हेंबर २०१८) अजित पाठारे यांची ७८ वी मालमत्ताही जप्त केली आहे. तसेच ११ विविध बँकांमधून सात लाखांची रक्कमही जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली.
..................................
ठेवीदारांनी संपर्क साधण्याचे आवाहन
या गुन्ह्यातील आरोपींची मालमत्ता जप्तीची कार्यवाही सुरू असून न्यायालयीन प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांना त्यांच्या ठेवी परत करण्याची कार्यवाही सक्षम प्राधिकारी यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यामुळे ठेवीदारांनी अन्य कोणत्याही यंत्रणेकडे किंवा व्यक्तीकडे संपर्क साधू नये. त्यांनी ठेवींच्या रकमेची मागणी दाखल केली नसल्यास ती जवळच्या पोलीस ठाण्यात बँक खात्याचा तपशीलासह विहित नमुन्यामध्ये अर्ज सादर करावा, असे आवाहन ठाण्याच्या अर्थिक गुन्हे शाखेच्या सहायक पोलीस निरीक्षक अनुजा घाडघे यांनी केले आहे.

Web Title: Maitreya has so far confiscated 78 assets worth Rs. 50 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.