रेल्वेच्या उन्नत मार्गासाठी मुंब्रा बाह्यवळण मार्गाच्या वाहतुकीत मोठा बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:41 AM2021-03-05T04:41:08+5:302021-03-05T04:41:08+5:30
ठाणे : ठाणे ते दिवा या पाचव्या मार्गिकेसाठी मुंब्रा रेतीबंदर येथे उन्नत मार्गावर दोन लोखंडी तुळई बसविण्यास पोलिसांनी परवानगी ...
ठाणे : ठाणे ते दिवा या पाचव्या मार्गिकेसाठी मुंब्रा रेतीबंदर येथे उन्नत मार्गावर दोन लोखंडी तुळई बसविण्यास पोलिसांनी परवानगी दिल्याने रेल्वे प्रशासनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हा कामाचा टप्पा सर्वांत महत्त्वाचा असून, ७ आणि २१ मार्च रोजी या तुळया उभारल्यानंतर अवघ्या काही महिन्यांत पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण होणार आहे.
या दोन्ही तुळयांचे वजन ३५५ टन असून, त्या ८० मीटर लांबीच्या आहेत. तसेच त्यांची रुंदी सहा मीटर आणि उंची ११ मीटर इतकी आहे. राजस्थान येथून आणून त्या रेतीबंदर येथे या सांगाड्यांना जोडण्यात आल्या. आता, या कामामुळे मुंब्रा बाह्यवळण मार्ग २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल करावा लागणार आहे.
---------------------
असे आहेत बदल
हलक्या वाहनांसाठी
- नवी मुंबईहून मुंब्रा बाह्यवळणमार्गे ठाणे, घोडबंदर येथे येणारी वाहने महापे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर मार्गे ठाण्यात येतील. किंवा कल्याण फाटा, शीळ फाटा येथे डावीकडे वळून महापे चौक, रबाळे, ऐरोली, विटावा, कळवानाका मार्गे ठाणे शहरात येतील. तसेच भिवंडीच्या दिशेने जाणारी वाहने कल्याण फाटा, कल्याण रोड, पत्री पूल, दुर्गाडी, कोनगाव, रांजनोली मार्गे जातील.
- नाशिकहून तळोजा, पनवेल, नवी मुंबईत जाणारी वाहने पडघा नाक्याहून, येवईनाका, सावदनाका, बापगाव, आधारवाडी, पत्री पूल, चक्की नाका, नेवाळी मार्गे एमआयडीसी, तळोजा सिमेंटरोड येथून कळंबोळी नवी मुंबईत जातील.
- खारेगाव टोलनाका येथून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने खारेगाव टोलनाका येथून माजीवडा, कॅडबरी जंक्शन, तीनहातनाका येथून मुलुंड टोलनाका, ऐरोली मार्गे जातील. किंवा साकेत रोडने, कळवा खाडीपूल, विटावा मार्गे जातील. माजीवडा पुलाखालून गोकूळनगर मार्गे, कळवा, विटाव्याच्या दिशेने नवी मुंबईत जाण्याचा पर्यायही वाहन चालकांना उपलब्ध असेल.
---------------
अवजड वाहनांसाठी
- उरण जेएनपीटीहून भिवंडी, नाशिकच्या दिशेने जाणारी अवजड वाहने नवी मुंबईतील कळंबोळी चौक येथून उजवीकडे वळण घेऊन तळोजा एमआयडीसी, उसाटणे, खोणी फाटा, नेवाळी नाका, पत्री पूल, दुर्गाडी चौकातून भिवंडी किंवा मुंबई - नाशिक महामार्गे नाशिकच्या दिशेने जातील.
- जेएनपीटीहून घोडबंदर, ठाण्याच्या दिशेने येणारी वाहने कळंबोळी चौक, नावडे फाटा येथून उजवीकडे वळण घेऊन कल्याण फाटा, शीळ फाटा येथून डावीकडे वळून महापे, रबाळे, ऐरोली, मुलुंड टोलनाका, आनंदनगर मार्गे ठाणे घोडबंदरच्या दिशेने ये-जा करतील.
- नाशिकहून मुंब्रा बाह्यवळण मार्गे नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहने खारेगाव टोलनाका येथून माजीवडा ब्रिज, कॅडबरी जंक्शन, तीनहात नाका, आनंदनगर येथून नवी मुंबईत जातील. किंवा रांजनोली, कोनगाव, दुर्गाडी चौक, चक्की नाका, नेवाळी, खोणी गाव मार्गे जातील.
----------------