मराठी पाट्या करा, अन्यथा खळखट्याक आंदोलनाला सामोरे जा, मनसेचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 01:07 PM2023-11-26T13:07:13+5:302023-11-26T13:08:10+5:30
न्यायालयाच्या आदेशानंतरही दुकानदारांनवर कारवाई नाहीच
ठाणे - शहरातील सर्व दुकानांवरील पाट्या ह्या २५ नोव्हेंबर अखेर मराठीत कराव्यात असा निर्णय न्यायालने दिला होता. हा अल्टिमेटम संपल्यामुळे आणि याबाबत ठाण्यातील बाजारपेठांमध्ये कोणतीच कारवाई न झाल्याने मराठीत पाट्या करा, नाहीतर मनसेचा खळखट्याक आंदोलनाला सामोरे जा असा इशारा देत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांच्या वतीने रविवारी ठाण्यात तीव्र आंदोलन करत निषेध केला.
मनसेने सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरुन आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात कोर्टाने दिलेल्या डेडलाईन नंतरही राज्यात अजून अनेक ठिकाणी पाट्या मराठी भाषेत केल्या गेल्या नाही. गेल्या १४ वर्षांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मुद्द्यावरून लढत आहे. मनसेच्या वतीने मराठी पाट्यांसाठी विविध आंदोलन देखील करण्यात आली यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल झाले. मात्र अद्यापही राज्यात मराठी पाट्यांचे फलक फारसे झळकताना दिसत नाही. दोन महिन्यांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सर्व दुकानांना तसेच व्यावसायिकांना त्यांच्या आस्थापनांवरील पाटी मराठी असावी, यासाठी २५ नोव्हेंबरपर्यंतचा कालावधी देण्यात आला होता. या आदेशाचे पालन करून घेणे हे स्थानिक महानगरपालिका प्रशासन व कामगार आयुक्त यांचे काम आहे. पण असे असून देखील महानगरपालिका व कामगार प्रशासनाच्या वतीने अद्यापही ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील दुकानांना मराठी पाट्या करण्यासंदर्भात साधी नोटीस देखील बजावण्यात आलेली नाही.
आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी अस्मिता तसेच महाराष्ट्रातील तमाम मराठी लोकांच्या अपमान करणाऱ्या ठाण्यातील एम जी या चायनीज ऑटोमोबाईल कंपनीच्या शोरूम ला काळे फासून आंदोलन करत तीव्र निषेध करण्यात आला. तसेच ठाण्यातील सर्व व्यावसायिक धारकांनी त्यांच्या दुकानावरील पाटी मराठीत करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित व विधी विभागाचे शहर अध्यक्ष स्वप्निल महिंद्रकर यांनी दिला.आंदोलनात मनसेचे दिनकर फुल्सुंदर,मनीष सावंत,हिरा
पासी ,कृष्णा देवकोटा व आधी मनसैनिक उपस्थित होते.
मराठी पाट्या करण्यासंदर्भात प्रशासनाकडून ठोस कारवाई करण्यात आली नाही तर मनसेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात येईल व त्याची सर्वस्व जवाबदारी ही प्रशासनाची असेल
स्वप्नील महिंद्रकर
ठाणे शहर अध्यक्ष जनहित व विधी विभाग मनसे