उल्हासनगरातील पूरग्रस्त भागाचे पंचनामे करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:40 AM2021-07-29T04:40:03+5:302021-07-29T04:40:03+5:30
उल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी व उल्हास नदीच्या पुराचा फटका नदीकिनाऱ्यावरील झोपडपट्टीला बसला आहे. त्यामुळे शेकडो जणांचे संसार उघड्यावर ...
उल्हासनगर : शहरातून वाहणाऱ्या वालधुनी व उल्हास नदीच्या पुराचा फटका नदीकिनाऱ्यावरील झोपडपट्टीला बसला आहे. त्यामुळे शेकडो जणांचे संसार उघड्यावर पडले. या पूरग्रस्त भागाचे पंचनामे करून, मदत देण्याची मागणी मनसेने प्रांत अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली.
उल्हासनगरात गेल्या आठवड्यात संततधार पावसाने वालधुनी आणि उल्हास नदीला पूर येऊन, नदीकिनाऱ्यावरील भारतनगर, सम्राट अशोकनगर, रेणुकानगर, मीनाताई ठाकरेनगर, करोतियानगर आदी परिसरात पुराचे पाणी घुसून शेकडो जणांचे संसार उघड्यावर आले. घरातील अन्नधान्य, कपडे, संसार उपयोगी वस्तू, टीव्ही, फ्रीज आदी इलेक्ट्रॉनिक वस्तू खराब झाल्या. यामुळे पुढे जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. एक आठवडा उलटूनही पूरग्रस्त भागाचे पंचनामे झाले नसल्याने, मनसेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, पक्ष पदाधिकारी प्रदीप गोडसे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन पूरग्रस्त घरांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे, तसेच कॅम्प नं. ३ शांतीनगर येथे नदीच्या पाण्यात चार वर्षांचा मुलगा पाण्यात पडून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाइकांना मदत करण्याची मागणी मनसे शिष्टमंडळाने केली.
याबाबत तहसीलदार विजय वाकोडे यांना पूरग्रस्त भागाच्या पंचनाम्यांसंदर्भात विचारले असता, जी घरे दोन दिवस पुराच्या पाण्यात होती. त्याच घरांचे पंचनामे करा, असा शासनाचा अध्यादेश असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली. असे असताना तलाठी यांना पूरग्रस्त भागांची पाहणी करण्याचे आदेश दिले असून, शासनाचे या संदर्भात आदेश आल्यास पूरग्रस्त भागाचे पंचनामे सुरू करण्यात येतील.