आयुक्तबदलाची नोंद गिनीज बुकमध्ये करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 03:18 AM2018-04-27T03:18:22+5:302018-04-27T03:18:22+5:30
पवार यांच्या निर्णयामुळे सत्ताधारी नेत्यांचे हितसंबंध दुखावल्याची शिक्षा त्यांना केल्याचा आरोप त्यांनी केला.
भार्इंदर : राज्यातील भाजपा सत्ताकाळात चार वर्षांत चार आयुक्त, त्यांचा कार्यकाळ पूर्ण न करताच बदलल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेची गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद व्हावी, अशी उपहासात्मक प्रतिक्रिया मीरा-भार्इंदर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष अनिल सावंत यांनी दिली.
यापूर्वीच्या मुख्यमंत्र्यांची शहरात येजा होत नसली, तरी शहराचा विकास मात्र होत होता. परंतु, भाजपाच्या सत्ताकाळात विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शहरात सतत राबता असल्याने त्यांचे शहराकडे अधिकच बारीक लक्ष असल्याचा टोला सावंत यांनी लगावला. तत्कालीन आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या बदलीसाठी भाजपा लोकप्रतिनिधींनी आपली कार्यालये बंद ठेवून जनतेला वेठीस धरले होते. त्यानंतर, आयुक्तापदावर विराजमान झालेल्या बळीराम पवार यांची तर अवघ्या दोन महिन्यांतच उचलबांगडी करण्यात आली. पवार यांच्या निर्णयामुळे सत्ताधारी नेत्यांचे हितसंबंध दुखावल्याची शिक्षा त्यांना केल्याचा आरोप त्यांनी केला. असे सुडाचे राजकारण करणाऱ्या सत्ताधाºयांनी पालिकेत आयुक्त नियुक्त न करता स्वत:च प्रशासन चालवावे, असा उपरोधिक सल्लाही त्यांनी भाजपाला दिला.
रखडलेला उत्तन घनकचरा प्रकल्प, तीव्र पाणीटंचाई, ठप्प झालेली विकासकामे, कोलमडलेली परिवहनसेवा, पालिका शाळांची दुरवस्था, वाढलेली अनधिकृत बांधकामे, रद्द झालेला विकास आराखडा, रेंगाळलेली पंतप्रधान आवास योजना, अनधिकृत फेरीवाल्यांची समस्या आदी प्रश्नांमुळे शहरातील जनता त्रस्त असताना क्षुल्लक कारणास्तव आयुक्त बदलणे हा जनतेवर अन्याय आहे, असे सावंत म्हणाले. भाजपाच्या सत्ताकाळात गेल्या चार वर्षांत चार आयुक्तांचा राजकीय बळी घेण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
...तर रस्त्यावर उतरणार
शहराच्या विकासाकरिता स्थानिक नेत्याच्या मर्जीतील नव्हे तर एक सक्षम आयुक्त मुख्यमंत्र्यांनी द्यावा. सरकारने या गोंधळात लक्ष घातले नाही, तर काँग्रेस रस्त्यावर उतरून भाजपाच्या प्रशासकीय कारभारातील हस्तक्षेपाचा तीव्र विरोध करील.