१५ सेकंदांत करा मतदान
By Admin | Published: February 18, 2017 06:46 AM2017-02-18T06:46:43+5:302017-02-18T06:46:43+5:30
उल्हासनगर महापालिकेत चार उमेदवारांचे एक पॅनल असल्याने प्रत्येक मतदाराला चार उमेदवारांना स्वतंत्र मतदान करावे लागेल.
पंकज पाटील /उल्हासनगर
उल्हासनगर महापालिकेत चार उमेदवारांचे एक पॅनल असल्याने प्रत्येक मतदाराला चार उमेदवारांना स्वतंत्र मतदान करावे लागेल. त्यामुळे अवघ्या १५ सेकंदात एकेका मतदाराला प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. तसे झाले, तरच वेळेत मतदान पूर्ण होऊ शकेल. प्रत्यक्षात मात्र एका मतदाराला दोन ते तीन मिनिटांचा कालावधी लागेल, असा अंदाज निवडणूक अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
नव्या मतदान प्रक्रियेत मतदाराला विलंब लागणारअसला, तरी निवडणूक आयोगाने वेळेच्या या नियोजनाकडे दुर्लक्ष केले आहे. एका बुथवर सरासरी ७५० मतदारांना मतदान करावे लागणार आहे. परंतु, या ७५० मतदारांसाठी वेळ मात्र ६०० मिनिटे म्हणजे अवघे १० तास आहेत. एका मतदाराला सरासरी किमान २ ते ३ मिनिटे लागणार असल्याने असंख्य मतदारांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागणार आहे. तर, काहींना मतदानाच्या रांगा पाहून मतदान न करताच घरी परतण्याची वेळ येण्याची चिन्हे आहेत. मतदारांची संख्या आणि मतदानाच्या वेळेतील नियोजनात चूक झाल्याने मतदानाचा टक्का घसरण्याची शक्यता आहे.
उल्हासनगर ापालिकेने २० प्रभागांसाठी ५४३ मतदान बुथ उभारण्याची तयारी केली आहे. मतदारांची संख्या आणि बुथची संख्या पाहता प्रत्येक बुथवर मतदानाचा टक्का वाढल्यास मोठ्या प्रमाणात गर्दी पाहावयास मिळणार आहे. प्रत्येक मतदाराला ४ मते टाकावी लागणार असल्याने उमेदवार या मतदारांना मतदान केंद्रांवर नेण्यासाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावत आहे. त्यातच, निवडणूक आयोगाने मतदानाचा टक्का वाढावा, यासाठी मतदारांमध्ये जनजागृतीचा मार्ग अवलंबला आहे. उल्हासनगरमध्ये सरासरी ४५ टक्के मतदान होत असले तरी यंदा मतदार यादीतील नावे कमी झाल्याने तो वाढेल, असा अंदाज आहे. जास्तीतजास्त मतदारांनी मतदान केंद्रांवर येऊन आपला हक्क बजवावा, यासाठी आयोग प्रयत्न करत असला, तरी प्रत्यक्षात मतदान केंद्रांवर वेळेचे नियोजन करण्यात कमी पडत आहे.
उल्हासनगरमधील ५४३ बुथमध्ये अनेक ठिकाणी ७५० च्या वरच मतदार आहेत. एका बुथवर ७५० मतदार मतदानासाठी येणार, असे आयोगाने गृहीत धरले आहे. मात्र, प्रत्यक्षात या ७५० मतदारांना मतदान करण्यासाठी दिलेली वेळ मात्र कमी आहे. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंतच मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. मतदानासाठी १० तास म्हणजे ६०० मिनिटे दिली आहेत. मात्र, मतदारांचा आकडा ७५० असल्याने प्रत्येक मतदाराला कसेबसे ४५ सेकंदच मिळतील. बुथमधील कार्यपद्धती पाहता एक मतदार बुथमध्ये गेल्यावर त्याचा मतदान क्रमांक शोधणे, त्याच्या ओळखपत्राची चाचपणी करणे, स्वाक्षरी करणे, बोटावर शाई लावणे, चार व्होटिंग मशीन कार्यान्वित करणे आणि त्यानंतर यंत्राजवळ गेल्यावर मतदाराला आपला उमेदवार शोधून त्या ठिकाणचे बटण दाबणे आणि ते वोटिंग पूर्ण झाल्यावर बाहेर पडणे, या सर्वांसाठी सरासरी २ ते ३ मिनिटे लागणार आहे. वोटिंगची कार्यपद्धती जलद गतीने होणार, अशी अपेक्षा जरी केली, तरी प्रत्येक मतदाराला किमान मतदान करण्यासाठी बुथमध्ये २ मिनिटे ही निश्चितच लागणार आहे. त्यामुळे एका बुथवरील ७५० मतदारांना हक्क बजावण्यासाठी १५०० मिनिटे म्हणजे २५ तास लागायला हवेत. प्रत्यक्षात अवघे १० तास दिले आहेत.
मतदारांचा आकडा आणि त्यांना लागणाऱ्या मतदानासाठीच्या वेळेचा ताळमेळ घालण्यात न आल्याने अनेक मतदारांनाचा हक्क बजावण्यासाठी तासन्तास रांगेत उभे राहावे लागणार आहे. निवडणूक आयोगाने एका बुथवर केवळ ३०० मतदारांचा समावेश करणे गरजेचे होते. ३०० मतदारांना ६०० मिनिटे ही पुरेशी होण्यासारखी होती. मात्र, ३०० ऐवजी प्रत्येक बुथवर किमान ७५० मतदार टाकल्याने आयोगाने १०० टक्के मतदार मतदानासाठी येणार नाही, हेच गृहीत धरून बुथ तयार केल्याचे दिसत आहे. ज्या निवडणूक आयोगाला १०० टक्के मतदानाची अपेक्षा आहे, त्याच निवडणूक आयोगाने बुथची रचना त्याप्रमाणे केलेली नाही. उल्हासनगरमध्ये जे बुथ उभारण्यात आले आहेत, त्या बुथच्या दुपटीपेक्षा जास्त बुथची गरज मतदारांना होती. मात्र, बुथची संख्या कमी असल्याने मतदारांना आपला हक्क बजावण्यासाठी रांगेत वेळ घालवावा लागेल. त्यातच, अनेक मतदार रांगा पाहून हक्क न बजावताच निघून जाण्याची शक्यता आहे. उल्हासनगरमध्ये ५० टक्के मतदानाचा आकडा गृहीत धरला, तरी या मतदारांच्या रांगा चुकणार नाहीत, असा अंदाज आहे.
उल्हासनगरमध्ये मतदारांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्याचा प्रयत्न केल्यास त्याचा त्रास त्या मतदारांनाच होणार आहे. मतदान आणि त्यासाठी दिलेला वेळ याचा ताळमेळ घालण्यात निवडणूक आयोगाला अपयश आल्यानेच उल्हासनगरमध्ये मतदानाची टक्केवारी घसरणार आहे.