"रील्स बनवा, १० लाख कमवा"; जितेंद्र आव्हाडांचं तरुण पिढीला आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 12:02 PM2023-08-06T12:02:16+5:302023-08-06T12:03:15+5:30
मनसेने काही दिवसांपूर्वी रीलबाझ हा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये, रिल्सस्टार्सच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
ठाणे/मुंबई - सोशल मीडियाचं महत्त्व आता सर्वच राजकीय नेत्यांच्या लक्षात आलं आहे. या सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत सहज आणि अधिक प्रभावीपणे पोहोचता येते. त्यामुळेच, फेसबुक, ट्विटर व इंस्टाग्रामवर नेतेमंडळी अधिक सक्रीय बनली आहे. काही दिवसांपूर्वी मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सोशल मीडियावरील प्रभावी रिल्स क्रिएटर्संचा सन्मान केला. या सोहळ्यात त्यांनीही नव्या पिढीला रिल्सच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न मांडण्याचं आवाहन केलं. आता, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट उत्तम रिल्स बनवणाऱ्यास १० लाख रुपयांचे बक्षीत देणार असल्याची घोषणाच केली.
मनसेने काही दिवसांपूर्वी रीलबाझ हा कार्यक्रम घेतला. त्यामध्ये, रिल्सस्टार्सच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. आता, आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही ठाण्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमात रिल्स बनवण्याचं आवाहन तरुण पिढीला केलं आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांचा ६० वा वाढदिवस ५ ऑगस्ट रोजी झाला. या वाढदिवसाला आपण अज्ञातस्थळी जाणार असल्याचं आव्हाड यांनी एक दिवस अगोदरच जाहीर केलं होतं. मात्र, ठाण्यातील कार्यक्रमात ते दिसून आले.
ठाण्यातील रंगायतन सभागृहात राष्ट्रवादीच्यावतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव-सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात आव्हाड यांनी राज्यातील आणि देशातील परिस्थितीवर भाष्य केलं. मणीपूर जळत आहे, तर महाराष्ट्रातही दंगली घडवण्याचं काम सुरू असल्याचं आव्हाड यांनी म्हटलं. त्यामुळे, सोशल मीडियाचा वापर तुमच्यासारख्या पिढीने करायलं हवा. तुम्ही रिल्स बनवता का? असा प्रश्न आव्हाड यांनी उपस्थितांना विचारला. तसेच, नसेल बनवत तर बनवायला शिका, असेही ते म्हणाले. त्यासाठी, मी आता सर्वोत्तम रील्सची स्पर्धाच भरवणार आहे. त्यामध्ये, सर्वोत्तम रिल्ससाठी १० लाख रुपयांचं बक्षीस देण्यात येईल, असेही आव्हाड यांनी म्हटले.
दरम्यान, सोशल मीडिया हे राजकारणातील सर्वात प्रभावी शस्त्र बनल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपासह सर्वच राजकीय पक्ष या सोशल मीडियाच्या वापरातून आपली भूमिका, कार्यक्रम आणि विचारांचा प्रचार व प्रसार करत आहेत. तर, पत्रकारिताही याच सोशल मीडियावर व्यापून गेली आहे.