मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, तोवर फडणवीस सरकारप्रमाणे सवलती द्याव्यात : नारायण राणे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 05:08 PM2021-05-31T17:08:43+5:302021-05-31T17:09:54+5:30

Maratha Reservation Mahavikas Aghadi : मराठा समाजाला ३ हजार कोटींचं पॅकेज देण्याची राणे यांची मागणी. सरकार स्थिर नाही, ते केव्हाही पडेल, आज रात्री झोपले की सकाळी सरकार पडले अशी परिस्थिती असल्याचं म्हणत राणे यांची टीका.

Make sincere efforts for Maratha reservation, till then concessions should be given like Fadnavis government: Narayan Rane | मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, तोवर फडणवीस सरकारप्रमाणे सवलती द्याव्यात : नारायण राणे

मराठा आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न करावे, तोवर फडणवीस सरकारप्रमाणे सवलती द्याव्यात : नारायण राणे

Next
ठळक मुद्देआज रात्री झोपले की सकाळी सरकार पडले अशी परिस्थिती असल्याचं म्हणत राणे यांची टीका. मराठा समाजाला ३ हजार कोटींचं पॅकेज देण्याची राणे यांची मागणी.

ठाणे  : "शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात गंभीर चुका केल्यामुळेच मराठा समाजाचे आरक्षण गेले आहे. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळण्यासाठी महाविकास आघाडीने आता तरी प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या होत्या तशा शिक्षण आणि रोजगारासाठीच्या सवलती मराठा समाजाला द्याव्यात व त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज द्यावे," अशी मागणी भाजपचे खासदार नारायण राणे यांनी ठाणे येथे केली.

"मराठा आरक्षणासाठी सुमारे तीस वर्षे लढा सुरू होता. अखेरीस तत्कालीन मुख्यमंत्नी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप महायुती सरकारने कायदा करून मराठा समाजाला आरक्षण दिले. भाजप सरकारने मराठा आरक्षण उच्च न्यायालयात टिकवले आणि हे सरकार असेपर्यंत आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती आली नाही. परंतु, महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर मराठा आरक्षणाबाबत अनेक चुका करण्यात आल्या. सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यात महाविकास आघाडी सरकार पूर्ण अपयशी ठरले. सर्वोच्च न्यायालयात ज्या मुद्द्यांवर मराठा आरक्षण रद्द झाले त्याच मुदद्यांवर भाजप सरकारने उच्च न्यायालयात आरक्षण टिकवले," असेही राणे यांनी यावेळी सांगितले. 

महाविकास आघाडी सरकारने बेफिकीरी दाखवल्याने सर्वोच्च न्यायालयात चांगल्या रितीने बाजू मांडली गेली नाही. महाविकास आघाडी सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नव्हता, वकील वेळेत न्यायालयात हजर झाले नाहीत, सरकारने खटला चालविण्यात टाळाटाळ करून तारखा मागितल्या, गायकवाड आयोगाच्या अहवालाच्या परिशिष्टाचे इंग्रजीत भाषांतर करून दिले नाही आणि त्यामुळे आयोग एकतर्फी असल्याचा समज निर्माण झाला, अशा अनेक चुका महाविकास आघाडी सरकारने केल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

फेरविचार याचिकेचा उपाय सरकारच्या हाती

"मराठा आरक्षण टिकविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करण्याचा उपाय राज्य सरकारच्या हातात आहे, परंतु आजपर्यंत त्यांनी तसे केलेले नाही आणि मुदत संपत चालली आहे. मराठा समाजाचे असलेले आरक्षण गमावले तरीही महाविकास आघाडी सरकारची बेफिकिरी कमी होत नाही. दुसरीकडे केंद्र सरकारने मात्र १०२ व्या घटनादुरु स्तीनंतर राज्यांचा अधिकार अबाधित आहे, हे स्पष्ट होण्यासाठी फेरविचार याचिका दाखल केली आहे," असं राणे यावेळी म्हणाले. 

आरक्षणासाठी राज्य सरकारचा पुढाकार आवश्यक

"१०२ व्या घटनादुरु स्तीनंतरही मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारलाच पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी सर्वप्रथम राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाज मागास असल्याचा अहवाल नव्याने घ्यावा लागेल व त्यामध्ये गायकवाड आयोगाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने मांडलेल्या मुद्द्यांचे उत्तर असावे लागेल. त्यानंतर तो अहवाल केंद्रीय मागासवर्ग आयोगाकडे पाठवावा लागेल, त्यांच्या मंजुरीनंतर तो राष्ट्रपतींकडे जाईल व त्यांच्या मंजुरीनंतर राज्याला मराठा समाजासाठी आरक्षणाचा कायदा पुन्हा करता येईल. त्या दृष्टीने राज्य मागासवर्ग आयोगाचे गठन करण्यासह कोणतेही पाऊल महाविकास आघाडी सरकार उचलत नाही. केवळ पंतप्रधान व राष्ट्रपतींना निवेदन देऊन मराठा समाजाची दिशाभूल करण्याचा आणि आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत आहे," अशी टीकाही त्यांनी केली. मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत देवेंद्र फडणवीस सरकारने दिल्या होत्या तशा शिक्षण व रोजगारासाठीच्या सवलती द्याव्यात व त्यासाठी तीन हजार कोटींचे पॅकेज मराठा समाजाला द्यावे अशी मागणीही त्यांनी केली.

फडणवीस-पवार भेट अराजकीय

देंवद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्यात झालेली भेट ही राजकीय नसून ती भेट अजराकीय आहे. या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नाही, यापूर्वी मी देखील पवार यांना भेटलो असल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु या भेटीमुळे कोणाची तब्बेत बिघडणार असेल तर त्यांनी औषध घ्याव इंजेक्शन देखील उपलब्ध आहे, अशी टीकाही केली. "महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी सोडून इतर सगळे बोलतात आम्ही जाऊ आम्ही जाऊ. मात्र राष्ट्रवादीवाले मात्र बोलतात कोणीही येऊ दे आम्ही सरकारमध्ये असणार, असं म्हणत राणे यांनी राष्ट्रवादीची खिल्ली देखील त्यांनी उडविली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे येतात आणि हात धुवायला सांगतात, लगेच लॉकडाऊन घोषित करतात. विकास ठप्प आहे, सरकार स्थिर नाही, ते केव्हाही पडेल, आज रात्री झोपले की सकाळी सरकार पडले अशी परिस्थिती सध्या या महाविकास आघाडी सरकारची असल्याचेही राणे यांनी सांगितले.
 

 

Web Title: Make sincere efforts for Maratha reservation, till then concessions should be given like Fadnavis government: Narayan Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.