कळवा-मुंब्राही स्मार्ट करा
By admin | Published: December 6, 2015 12:49 AM2015-12-06T00:49:46+5:302015-12-06T00:49:46+5:30
स्मार्ट सिटीत ठाणे स्टेशनची निवड करण्याऐवजी जी जागा मोकळी आहे, ग्रामीण भागात आहे, अशा भागाचा समावेश केला असता तर ते अधिक फायदेशीर ठरले असते. परंतु, स्मार्ट
ठाणे : स्मार्ट सिटीत ठाणे स्टेशनची निवड करण्याऐवजी जी जागा मोकळी आहे, ग्रामीण भागात आहे, अशा भागाचा समावेश केला असता तर ते अधिक फायदेशीर ठरले असते. परंतु, स्मार्ट सिटीतून ग्रामीण भागाला वगळल्याचा आरोप करून शिवसेनेचे नगरसेवक सुधीर भगत यांनी सत्ताधाऱ्यांनाच घरचा आहेर दिला. तर, कळवा-मुुंब्य्रातील नगरसेवकांनी त्यांच्या विभागाला वगळल्याबद्दल टाहो फोडला.
ठाणे महापालिकेने तयार केलेल्या स्मार्ट सिटीचा अंतिम आराखडा शनिवारी झालेल्या विशेष महासभेत पटलावर ठेवला होता. परंतु, त्याचे सादरीकरण होण्याआधीच भगत यांनी दिवा, मुंब्रा या भागात आजही काही मोकळे भूखंड आहेत, त्या ठिकाणी अधिक चांगल्या प्रकारे स्मार्ट सिटीअंतर्गत विकास करता आला असता. आजही या भागातील नागरिकांना एसटीतून प्रवास करावा लागत आहे. ग्रामीण भागाला वगळल्याने हा त्यांचा अवमानच असल्याचे ते म्हणाले. तर कळवा, मुंब्रा, दिव्यातील नागरिकांना पाणी द्या, मग स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवा, अशी मागणी नगरसेविका रीटा यादव यांनी केली. स्मार्ट सिटीच्या नावाखाली आतापर्यंत ठाणेकरांना अनेक दिवास्वप्ने दाखविली जात आहेत. परंतु, यापूर्वी जेएनएनयूआरएमअंतर्गत मिळालेल्या निधीची कामे आजही पूर्ण होऊ शकलेली नसल्याचा आरोप मनाली पाटील यांनी केला. विरोधक एकामागून एक आक्रमक होत असल्याचे पाहून महापौर संजय मोरे यांनी प्रथम पालिकेचे स्मार्ट सिटीचे सादरीकरण पाहा आणि मग आपण यावर चर्चा करावी, अशी सूचना केली. त्यानंतर, आयुक्त संजीव जयस्वाल यांनी यासंदर्भातील सादरीकरण केले. ते करताना ठाणे स्टेशन परिसरात सॅटीस आणि नवीन रेल्वे स्थानक आदींसह इतर पायाभूत सुविधा देण्यात येणार असल्याचे सांगितले. परंतु, २४ तास पाणी, एलईडी दिवे आणि क्लस्टर आदींसह इतर महत्त्वाच्या सुविधा या संपूर्ण ठाण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या स्पष्टीकरणानंतर नगरसेवकांनी या आराखड्याला मंजुरी दिली.
स्मार्ट सिटीचा अजेंडा काहींच्या हाती
स्मार्ट सिटीसंदर्भात घेतलेल्या विशेष महासभेचा अजेंडा काही सदस्यांच्या हाती रात्री १२ वाजता, तर काहींच्या हाती सकाळी ११ वाजता पडल्याची माहिती प्रभारी विरोधी पक्षनेते संजय भोईर यांनी दिली. त्यामुळे त्याचा अभ्यास कसा करायचा आणि चर्चा कशी करायची, असा सवाल त्यांनी केला.