कोरोना प्रतिबंधासाठी सूक्ष्म नियोजन करा; जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरांनी दिल्या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 08:28 PM2020-03-14T20:28:57+5:302020-03-14T20:29:01+5:30
'कोरोना' बाबत जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना आणि तयारीचा दैनंदिन आढावा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला.
ठाणे : कोरोना प्रतिबंधासाठीच्या उपाययोजनांचे सूक्ष्म नियोजन करुन त्यानुसार कार्यवाही करा. तसेच सर्व महानगरपालिका व नगरपालिका यांनी शहरांमध्ये विलगीकरण कक्ष अद्ययावत ठेवा अशा सूचना जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.
'कोरोना' बाबत जिल्हा प्रशासनाच्या उपाययोजना आणि तयारीचा दैनंदिन आढावा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ शिवाजी पाटील, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ कैलास पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनिष रेंगे, शिक्षणाधिकारी श्री बढे, श्रीमती भागवत, श्री कंकाळ उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी श्री नार्वेकर यांनी सांगितले, केंद्र शासनाच्या सूचनेनुसार विविध देशांमधून प्रवास करुन आलेल्या व्यक्तिंना क्वॉरंटाईन करावे. प्रत्येक शहरातील टुर ऑपरेटर्सकडून परदेश प्रवास केलेल्या आणि सध्या परदेशात असलेल्या प्रवाशांची यादी जिल्हा प्रशासनास प्राप्त होणार आहे. त्यानुसार योग्य त्या उपाययोजना कराव्यात. उपाययोजना करतांना सर्व यंत्रणांनी पुरेशी खबरदारी घ्यावी.
सार्वजनिक स्वच्छतागृह, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता ठेवण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या आहेत. त्या सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा. संशयित आढळल्यास त्यांच्या प्रवासाची माहिती, त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती याबाबत विचारपूस करण्यासाठी पथके तयार करा. बारकाईने विचारपूस करुन तात्काळ आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अशा विविध सुचना त्यांनी यावेळी दिल्या. शालेय व महाविद्यालयीन विध्यार्थ्यांना तसेच नागरिकांना स्वच्छतेच्या खबरदारीबाबत प्रशिक्षित करा अशा सुचना शिक्षणाधिका-यांना यावेळी जिल्हाधिकार्यांनी दिल्या.
जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर कारवाई
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी वापरण्यात येणाऱ्या मास्क, सॅनिटायझर, हँन्ड वॉश तसेच औषधसाठयाची उपलब्धता आदी विषयांबाबत दक्ष राहुन रास्त भावापेक्षा जास्त दराने विक्री करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश ही त्यांनी दिले.
परदेशातुन आला काळजी घ्या
सर्व परदेशातून परतणाऱ्या पर्यटकांनी स्वत:हून घरीच 15 दिवस स्वतंत्र रहावे. कुटुंबात अथवा समाजात मिसळू नये. लक्षणे आढळल्यास तात्काळ जिल्हायंत्रणेशी संपर्क साधा. सर्व वैद्यकीय सुविधा तात्काळ उपलब्ध करुन दिल्या जातील. दुर्लक्ष करु नका काळजी घ्या असे आवाहन श्री नार्वेकर यांनी केले आहे.