ठाकूर निवास पाडण्यासाठी महापालिका आयुक्तांना साकडे
By Admin | Published: June 10, 2017 01:12 AM2017-06-10T01:12:36+5:302017-06-10T01:12:36+5:30
शहरातील घंटाळीदेवी मंदिर व संभाजी पथ या रस्त्यांवर दीर्घकाळापासून उभी असलेली व जीर्ण झालेली ठाकूर निवास ही इमारत
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : शहरातील घंटाळीदेवी मंदिर व संभाजी पथ या रस्त्यांवर दीर्घकाळापासून उभी असलेली व जीर्ण झालेली ठाकूर निवास ही इमारत या पावसाळ्यात पडण्याची दाट शक्यता आहे. या इमारतीच्या परिसरातून सहा शाळांचे विद्यार्थी सतत येजा करत असतात. दुर्दैवी घटना घडू नये, तत्पूर्वी ही धोकादायक इमारत वेळीच पाडण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना साकडे घालण्यात आले आहे.
विष्णूनगरमधील ही ठाकूर निवास इमारत पालिकेने काही वर्षांपासून धोकादायक म्हणून घोषित केली आहे. यानंतर येथील रहिवाशांना अन्यत्र हलवून इमारत रिकामी केली आहे. जीर्ण झालेल्या या इमारतीचे प्लास्टर अधूनमधून निखळत आहे. सतत वर्दळ असलेल्या रस्त्याच्या कडेला ही इमारत जीर्णावस्थेत तग धरून उभी आहे. त्यापासून कोणत्याही प्रकारची जीवित व वित्तहानी होऊ नये, यासाठी ठाकूर निवास इमारत पाडणे गरजेचे आहे, त्याकडे महापालिका आयुक्तांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांना लेखी पत्र ई-मेलद्वारे दिल्याचे येथील समाजसेवक महेंद्र मोने यांनी लोकमतला सांगितले.
घंटाळीदेवी मंदिर पथ आणि संभाजी पथ येथील ठाकूर निवास ही अतिशय धोकादायक इमारत आहे. या परिसरात पाच ते सहा शाळा आहेत. यातील विद्यार्थी व त्यांचे पालक, ज्येष्ठ नागरिक यांची येथून सतत वर्दळ चालू असते. अशा परिस्थितीत जर दुर्दैवाने ही इमारत कोसळली तर जीवित व वित्तहानी होण्याची
शक्यता आहे. त्यास वेळीच पायबंद घालून इमारत भुईसपाट करावी, यासाठी ठाणे महापालिका आयुक्तांच्या निदर्शनात आणून दिले आहे.