दुकान विक्रीच्या नावाखाली मालाडच्या व्यावसायिकाची ३५ लाखांची रोकड ठाण्यातून लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 07:03 PM2018-06-18T19:03:11+5:302018-06-18T19:12:36+5:30

ठाण्यातील मोक्याच्या ठिकाणचे एक हॉटेल कमी किमतीत विकण्याचे आमिष दाखवून मालाड येथील एका व्यावसायिकाचे ३५ लाख रुपये घेऊन पळवून नेल्याचा प्रकार ठाण्यात घडला.

Malad's businessman's cash of Rs. 35 lakhs looted in Thane | दुकान विक्रीच्या नावाखाली मालाडच्या व्यावसायिकाची ३५ लाखांची रोकड ठाण्यातून लंपास

crime

Next
ठळक मुद्देकमी किमतीत दुकान देण्याचे आमिषचार आरोपींवर संशयचितळसर पोलिसांची कारवाई

ठाणे : एका दुकान विक्रीच्या नावाखाली मालाड येथील व्यावसायिकास ठाण्यात बोलावून त्याची ३५ लाखांची रोकड लंपास करणाऱ्या आरोपींविरूद्ध चितळसर पोलिसांनी शनिवारी गुन्हा दाखल केला.
मालाड येथील रहिवासी आनंद मिश्रा यांचा डिजीटल न्यूज चॅनलचा व्यवसाय आहे. संतोष शिवनारायण गुप्ता हे त्यांचे परिचित असून, मिश्रा यांना त्यांच्या व्यवसायात गुप्ता यांची नेहमी मदत होत असते. ठाण्यातील मानपाडा येथील हॉटेल रामजीच्या मालकावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले असून, त्यांनी त्यांचे हॉटेल दीड कोटी रुपयात विक्रीस काढले असल्याचे प्रॉपर्टी एजंट गोपाल याने संतोष गुप्ता यांना साधारणत: महिनाभरापूर्वी सांगितले होते. गुप्ता यांनी ही माहिती आनंद मिश्रा यांनी सांगितली. मिश्रा यांना हा व्यवहार फायद्याचा वाटल्याने त्यांनी यात रूची दाखवली. व्यवहाराची माहिती घेण्यासाठी मिश्रा काहीवेळा गुप्ता यांच्या मोबाईल फोनवरून गोपालशी बोलले. १४ जून रोजी गोपालने मिश्रा यांच्याशी संपर्क साधून हॉटेल पाहण्यासाठी बोलावले. त्यानुसार आनंद मिश्रा आणि संतोष गुप्ता हे हॉटेल पाहण्यासाठी ठाण्यात पोहोचले असता, गोपालने प्रकृती ठिक नसल्याचा बहाणा करून हॉटेल स्वत:च पाहण्यास सांगितले. मिश्रा यांनी हॉटेल पाहिले असता, त्यांना ते आवडले. त्यांनी तसे गोपालला लगेच कळवले. दुसर्‍या दिवशी १५ जून रोजी गोपालने संतोष गुप्ता यांच्याशी संपर्क साधला. हॉटेल रामजीचे मालक त्यांच्या वकिलाला सोबत घेऊन व्यवहाराबाबत बोलणी करण्यासाठी येणार असून, आपण टोकणची रक्कम घेऊन ठाण्याला या, असे त्याने संतोष गुप्ता यांना कळवले. त्यानुसार ३५ लाख रुपये घेऊन आनंद मिश्रा आणि संतोष गुप्ता हे ठाण्यात आले. ठाण्यात पोहोचल्यानंतर त्यांनी गोपालशी संपर्क साधला. त्याने प्रकृती अस्वास्थाचा बहाणा केला. आपला मित्र शहा याला तुमच्याकडे पाठवत असून, त्याच्यासोबत माझ्या कार्यालयावर या, असा निरोप त्याने मिश्रा यांना दिला. त्यानुसार मिश्रा, गुप्ता आणि शहा एका कारने गोपालच्या कार्यालयाकडे निघाले. काही अंतरावर एका वळणावर शहा पैशाची बॅग घेऊन अचानक कारमधून उतरला. जवळच उभ्या असलेल्या दुसर्‍या एका कारने त्याने पळ काढला. मिश्रा यांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तो सुसाट वेगात पळून गेला. त्यानंतर मिश्रा यांनी चितळसर पोलीस ठाणे गाठून झाला प्रकार पोलिसांना सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी गोपाल, शहा आणि अन्य दोन आरोपींविरूद्ध शुक्रवारी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

ठाण्यातील हॉटेल रामजीच्या मालकावर कोणतेही कर्ज नाही. केवळ तक्रारदाराला लुबाडण्यासाठी आरोपींनी हा बनाव रचला होता. आरोपींचा शोध सुरू आहे. मिश्रा यांचा सहकारी संतोष गुप्ता यांची या प्रकरणामध्ये नेमकी भूमिका काय आहे, हेदेखील तपासले जाईल.
सुनील घुगे
पोलीस निरीक्षक, चितळसर पोलीस ठाणे

Web Title: Malad's businessman's cash of Rs. 35 lakhs looted in Thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.