मलंगगड बस थांब्याची दुरवस्था, कल्याण एसटी डेपोमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2019 04:20 AM2019-02-20T04:20:04+5:302019-02-20T04:20:18+5:30
यात्रेकरूंनी व्यक्त केली नाराजी : कल्याण एसटी डेपोमध्ये अस्वच्छतेमुळे दुर्गंधी
कल्याण : माघ पौर्णिमेला होणारी मलंगगडची यात्रा मंगळवारी उत्साहात साजरी झाली. या यात्रेसाठी मंगळवारी कल्याण बस डेपोतून केडीएमसीने कल्याण-मलंगगड बस सोडल्या. मात्र डेपोतील मलंगगड बस थांब्याची दुरवस्था झाली आहे. त्याच्या स्वच्छतेकडे लक्ष देण्यास डेपो व्यवस्थापनास वेळ न मिळाल्याने यात्रेकरूंनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
कल्याण-मलंगगड मार्गावर प्रवासी अधिक असतात. त्यामुळे हा मार्ग उत्पन्न मिळवून देणारा आहे. मात्र, कल्याण बस डेपोतील मलंगगडाच्या बस थांब्याची दुर्दशा झाली आहे. तेथे रात्री गर्दुल्ल्यांचे वास्तव्य असते. डेपोच्या वरच्या मजल्यावरील सांडपाणी या थांब्यात ओघळते. त्यामुळे तेथील वातावरण कुबट आहे. काही वाटसरू तेथेच उघड्यावर लघवी करतात. अस्वच्छतेमुळे ही जागा अवैध धंद्याचा अड्डा बनला आहे. त्यामुळे प्रवासी थांब्याजवळ उभे राहत नाहीत.
मलंगगड बसथांब्याच्या बाजूला पडघा बसथांबा आहे. तेथे देखिल अस्वच्छता असल्याने ही बस आता फलाट क्रमांक एकवर अथवा कार्यशाळेलगत उभी केली जाते. मलंगगडच्या थांब्यावर आता राज्य परिवहन महामंडळाची पनवेल बस तेथे थांबते. बस उभी असे पर्यंत प्रवासी नाकाला रूमाला लावून बस कधी सुरू होणार, याची वाट पाहतात. डेपोतील स्वच्छतेचे कंत्राट खाजगी कंपनीला दिल्याचे सांगण्यात येते. मात्र, डेपोची स्वच्छता काही दिसून येत नाही. किमान मलंगगडाच्या यात्रेनिमित्त मंगळवारी तरी स्वच्छता होणे अपेक्षित होती. ती देखील करण्याकडे डेपो व्यवस्थापनाने डोळेझाक केली. यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला.
एका कमिटीने आणि केडीएमसीच्या परिवहन समितीने यात्रेकरूंच्या हार्दिक स्वागताचा फलक अस्वच्छ थांब्याजवळ लावला होता. मात्र, स्वच्छतेविषयी पाठपुरावा करण्याचे भानही त्यांना राहिले नाही, अशी टीका प्रवाशांनी केली.