मलंगगड नेवाळी नाका येथे महावितरण पथकाच्या कर्मचाऱ्यांना मारहाण, हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा
By सदानंद नाईक | Published: January 11, 2023 07:38 PM2023-01-11T19:38:06+5:302023-01-11T19:38:13+5:30
: हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका परिसरात वीज चोरीचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या पथकाला गावकऱ्यांकडून मारहाण झाली.
उल्हासनगर : हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेवाळी नाका परिसरात वीज चोरीचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या पथकाला गावकऱ्यांकडून मारहाण झाली. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी दिली.
उल्हासनगर हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मलंगगड परिसरातील नेवाळी नाका परिसरात वीज चोरी होत असल्याची माहिती कल्याण महावितरण विभागाला मिळाली होती. त्यानुसार महावितरण विभागाचे १० जणांचे पथक बुधवारी दुपारी गावात सर्वेक्षण करण्यासाठी गेले होते. वीज चोरीचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या पथकावर गावकऱ्यांनी हल्लाबोल केला. यावेळी झालेल्या मारहाणीत पथकातील सर्वजण जखमी झाले असून पथकात महिला कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. याप्रकाराने एकच खळबळ उडाली असून मारहाण प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात महावितरण विभागाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेतली. मारहाण झालेल्या पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्याचा जबाब पोलीस घेत असून रात्री उशिरा पर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस व महावितरण अधिकाऱ्यांनी दिली.
हिललाईन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित ढेरे यांनी नेवाळी नाका परिसरात महावितरण विभागाच्या पथकाला गावकऱ्याकडून मारहाण झाल्याची माहिती दिली. मारहाण झालेल्या पथकात महिला कर्मचारी असून मारहाण झालेल्या पथकातील कर्मचारी, वरिष्ठ अधिकारी यांचे जाब घेऊन गुन्हा दाखल करण्याचे संकेत त्यांनी दिले. याप्रकाराने एकच खळबळ उडाली असून घटनास्थळील नागरिकांनी कारवाईच्या भीतीने दुसरीकडे पलायन केल्याचे बोलले जाते. रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर अटकसत्र सुरू करण्याचे संकेत पोलिसांनी दिले.