माळशेज पर्यटनाची नवी ओळख ‘थितबी’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2019 01:34 AM2019-09-05T01:34:16+5:302019-09-05T01:34:57+5:30

वन पर्यटनाचा उत्कृष्ट नमुना : पर्यटकांना पाडणार भुरळ, निसर्गाचा घेता येणार आनंद

Malashej Tourism New Introduction 'Status' in thane | माळशेज पर्यटनाची नवी ओळख ‘थितबी’

माळशेज पर्यटनाची नवी ओळख ‘थितबी’

Next

पंकज पाटील 

बदलापूर : पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या माळशेज घाटात हजारो पर्यटकांची वर्दळ असते. माळशेज घाटात आता विकासकामेही सुरू झाली आहेत. माळशेज पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला येत असताना आता माळशेजच्या पर्यटन क्षेत्रात वनविभागानेही मोठी भर घातली आहे. वन पर्यटनाचा उत्कृष्ट नमुना माळशेज घाटाच्या पायथ्याची तयार करण्यात आला आहे. खोल दरीत अत्यंत सुबकतेने थितबी वन पर्यटन केंद्र उभारण्यात आले आहे. आता पर्यटकांची या ठिकाणीही गर्दी वाढत आहे. सोबत बारमाही पर्यटनाच्या केंद्रस्थानी आता थितबी राहणार आहे. आताच्या माळशेज घाट रस्त्याच्या खालच्या दरीतून जुना घाटमार्ग जातो. माळशेजच्या पायथ्याशी असणाऱ्या थितबी गावाजवळून वाहणाºया काळू नदीच्या पात्राजवळ हा प्राचीन मार्ग आहे. अजूनही अनेक हौशी पर्यटक या मार्गाने जातात. आमदार किसन कथोरे यांनी या परिसराचे महत्त्व ओळखून येथे बारमाही पर्यटनासाठी विविध नावीन्यपूर्ण प्रकल्प राबवले. वन विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय नावीन्यपूर्ण उपक्र मांतर्गत राबविण्यात आलेला ‘थितबी पर्यटन ग्राम विकास प्रकल्प’ त्यातूनच साकारला आहे.

थितबी गावापासून दोन ते अडीच किलोमीटर अंतरावर काळू नदीच्या काठी वन विभागाने तंबू आणि कंटेनर निवासाची सोय केली आहे. तिथून उंच डोंगरावरून कोसळणारे शुभ्र पांढºया फेसाळत्या पाण्याचे धबधबे न्याहाळता येतात. दरीत वाºयाचा दाब इतका प्रचंड असतो की, धबधब्यातील पाण्याचा प्रवाहही त्यामुळे वर ढकलल्यासारखा दिसतो. पावसाळ्याप्रमाणेच थंडी किंवा उन्हाळ्यातही येथील निसर्गसांैदर्य पाहण्यासाठी पर्यटक येतात.
कल्याण-नगर महामार्गावर घाट सुरू होण्याआधी एक लहान रस्ता थितबी गावाकडे जातो. याच गावातून पुढे वाहन घेऊन पर्यटन केंद्रापर्यंत पोहोचता येते.
काही पर्यटक गाडी गावातच उभी करून जंगल सफारी करत या ठिकाणी पोहोचतात. पायवाटेवर अनेक ठिकाणी ओढे वाहत असल्याने या ओढ्यातून मार्ग काढत पोहोचण्याचा आनंद वेगळा आहे. थितबीच्या स्थानिक ग्रामस्थांकडे या पर्यटनस्थळाचे व्यवस्थापन सोपवण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. याठिकाणी रिव्हर क्र ॉसिंगसारखे साहसी खेळ उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच लहान मुलांसाठी वॉल क्लायम्बिंग, रोप क्लायम्बिंग आणि इतर साहसी खेळ सुरू करण्यात आले आहे.

जंगलातून जाण्यासाठी गाडीची सोय : थितबीचा प्रवास तसा अवघड असला तरी ज्या पर्यटकांना जंगलातून चालणे शक्य नाही, त्यांना गाडीची सोयही करण्यात आली आहे किंवा पर्यटक स्वत: गाडी घेऊन त्या ठिकाणी जाऊ शकतील, अशी व्यवस्था केली आहे. या ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय करण्यात आली आहे. हे ठिकाण माळशेज घाटातून खाली कोसळणारे धबधबे ज्या दोन मोठ्या ओढ्यांतून वाहतात, त्या दोन ओढ्यांच्या मध्यभागी या ठिकाणी विकसित केले आहे.

Web Title: Malashej Tourism New Introduction 'Status' in thane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.