पार्किंगच्या नावावर गोळा होतो लाखो रुपयांचा मलिदा; खासगी मालकीच्या भूखंडांवर वाहने
By जितेंद्र कालेकर | Published: January 9, 2024 09:16 AM2024-01-09T09:16:14+5:302024-01-09T09:16:47+5:30
ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण याच पार्किंग माफियांनी रोखून धरल्याचे बोलले जाते
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: ठाणे रेल्वे स्टेशन परिसरात काही खासगी मालकीच्या भूखंडांवर वाहने पार्किंग करून जागामालक लाखो रुपयांचा मलिदा गोळा करीत असल्याची धक्कादायक माहिती आहे. ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण याच पार्किंग माफियांनी रोखून धरल्याचे बोलले जाते. अशा खासगी पार्किंग प्लॉटमधून जमीन मालक महिन्याकाठी लाखोंची कमाई करीत असल्याचे बोलले जाते. त्याचवेळी ठाणे महापालिकेच्या पोखरण रोड क्रमांक दोन या ठिकाणच्या तळ अधिक तीन मजली वाहनतळामध्ये शेकडो भंगार रिक्षा गेल्या दोन वर्षांपासून पडून आहेत. त्यामुळे या परिसरातील वाहने रस्ते अडवून उभी केली जातात.
ठाणे महापालिकेचे पार्किंग धोरण कागदावर आहे. याचाच गैरफायदा रेल्वेस्थानक परिसरात खासगी पार्किंगची व्यवस्था करणाऱ्या काही मंडळींनी घेतला आहे. चारचाकी, दुचाकी वाहनांचे पार्किंग करण्याकरिता खासगी भूखंड उपलब्ध करून देऊन त्यांनी आपले दुकान थाटले आहे. खासगी पार्किंग हा मोठा धंदा झाला आहे.
ठाण्यात रेल्वे स्टेशनजवळ रेल्वे, ठाणे महापालिका आणि खासगी जागांवर वाहनतळ आहेत. रेल्वे आणि ठाणे महापालिकेने ठेक्यावर गावदेवी मैदानाजवळ चालविण्यासाठी दिलेल्या जागा वाहनांच्या तुलनेत अपुऱ्या पडत आहेत. त्यामुळे खासगी मोक्याच्या ठिकाणच्या मोकळ्या निवासी जागा सर्रास भाड्याने किंवा विकत घेऊन वाहनतळ थाटण्यात आले आहे.
सिडको बसस्टॉपजवळ तांडेल यांनी त्यांच्या खासगी जागेत लकी स्कूटर स्टँड हे तळ अधिक एक मजली वाहनतळ सुरू केले आहे. सुमारे ४०० दुचाकींची या ठिकाणी क्षमता असून, १२ तासांसाठी ३०, तर २४ तासांसाठी ६० रुपये आकारले जातात. तर महिना ७०० रुपये दुचाकींसाठी घेतले जातात. यातून चार कामगारांच्या पगाराचे ५० हजार रुपये वगळल्यास तीन ते साडेतीन लाखांचा गल्ला महिनाभरात होतो.
गाडीचे कव्हर आणि हेल्मेटची कोणतीही जबाबदारी घेतली जाणार नसल्याचे सांगण्यात येते. थाेड्याफार प्रमाणात असेच दर स्टेशन परिसरातील वाहनतळांवर देण्यात आले आहेत.
पोखरणच्या पार्किंगमध्ये लूट
- दुचाकी वाहनासाठी महिना २५०, रिक्षासाठी ३००, तर चारचाकी वाहनांसाठी महिना ८०० ते १००० रुपये आकारले जातात. दिवसाकाठी रिक्षाचालकांकडून ३० रुपये घेतले जातात.
- बहुतांश वाहनमालक दररोजऐवजी महिनाकाठी या ठिकाणी वाहने उभी करतात. मनमानी पद्धतीने सुरू असलेल्या या दर आकारणीबाबत वाहनचालकांमध्ये नाराजी आहे.
विनाक्रमांकाची आणि चोरीचीही दुचाकी
- ठाणे स्टेशनजवळील एका खासगी वाहनतळावर विनाक्रमांकाची दुचाकी काही दिवसांपूर्वी लावण्यात आली होती. संबंधित वाहनतळ चालविणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
- एकाने चोरीची गाडी पार्किंगमध्ये उभी करून तो पसार झाला होता. काहीवेळा सोनसाखळी चोरही कोपरीतील एका पार्किंगमध्ये दुचाकी उभी करून पसार झाल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. खासगी पार्किंगमधून दोनवेळा दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत.
पालिकेच्या वाहनतळात भंगार वाहनांची गर्दी
पोखरण रोड क्रमांक दोन गांधीनगर भागात ठाणे महापालिकेचे तळ अधिक तीन मजली वाहनतळ आहे. नाथा कदम यांच्या ऑटो फॅब या खासगी कंपनीला हा ठेका दिलेला आहे. उत्पन्नातील ७५ टक्के रक्कम महापालिकेला, तर २५ टक्के रक्कम ठेकेदाराला मिळते. या वाहनतळामध्ये ६० ते ७० दुचाकी, १२ चारचाकी, ७० ते ८० रिक्षा बसतील इतकी जागा आहे. सध्या तळमजल्यावर १८ आणि पहिल्या मजल्यावर कचरावाहक ५८ घंटागाड्या ठेवल्या आहेत. एकीकडे पार्किंगला जागा अपुरी पडत असताना कोरोनाच्या लॉकडाऊन काळापासून या ठिकाणी ५० ते ६० रिक्षा उभ्या केल्या आहेत. त्यांचे चालक त्यानंतर फिरकलेच नाहीत. त्यामुळे हे वाहनतळ भंगार रिक्षांनी व्यापले आहे.