मलनि:सारणासाठी १३२ कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 02:10 AM2018-05-04T02:10:16+5:302018-05-04T02:10:16+5:30
केडीएमसीच्या मलनि:सारण योजनेच्या १३२ कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याला सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्राच्या अमृत योजनेंतर्गत ही मंजुरी मिळाली आहे.
कल्याण : केडीएमसीच्या मलनि:सारण योजनेच्या १३२ कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याला सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्राच्या अमृत योजनेंतर्गत ही मंजुरी मिळाली आहे.
मलनि:सारण योजनेसाठी केंद्र सरकारकडून ४४ कोटी २७ लाख, तर राज्य सरकारकडून २२ कोटी १४ लाख रुपयांचा निधी मिळणार आहे. केडीएमसीला स्वत:च्या हिश्श्याची ६६ कोटी ४१ लाख रुपयांची रक्कम उभी करायची आहे. केंद्र व राज्य सरकारकडून पहिल्या टप्प्यात २० टक्के, दुसºया आणि तिसºया टप्प्यात प्रत्येकी ४० टक्के निधी दिला जाणार आहे. योजनेच्या या टप्प्यांत शहरातील जुने झालेले सिव्हरेज पंपाचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे. त्यात लाल चौकी, गणेशघाट, रेतीबंदर, पंचायत बावडी आणि टेलकोसवाडी येथील सिव्हरेज पंपांचा समावेश आहे. हे पंप जुने असून मोडकळीस आलेले आहे. या योजनेची कामे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत लवकरच निविदा काढून पूर्ण केली जाणार आहेत. अमृत योजनेच्या पूर्ततेसाठी ‘क’ व ‘ड’ वर्ग पालिकांच्या योजनांचे काम जीवन प्राधिकरणामार्फत करण्याचा सरकारी नियम आहे.
दरम्यान, यापूर्वी अमृत योजनेंतर्गत मलनि:सारण योजनेचा १५३ कोटींचा टप्पा मंजूर झाला आहे. त्यातील कामे जीवन प्राधिकरणाने सुरू केली आहेत. मलनि:सारणासाठी प्रॉपर्टी चेंबर जोडण्याचे काम हाती घेतले आहे.