लक्ष्मी मार्केटवर मॉल?

By Admin | Published: January 10, 2016 12:33 AM2016-01-10T00:33:12+5:302016-01-10T00:33:12+5:30

रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि मोक्याचा भूखंड म्हणून गेली अनेक वर्षे चर्चेत असलेल्या लक्ष्मी मार्केटच्या जागी मॉल उभारण्याचा आणि तेथील किरकोळ

Mall on the Lakshmi Market? | लक्ष्मी मार्केटवर मॉल?

लक्ष्मी मार्केटवर मॉल?

googlenewsNext

- मुरलीधर भवार,  कल्याण
रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि मोक्याचा भूखंड म्हणून गेली अनेक वर्षे चर्चेत असलेल्या लक्ष्मी मार्केटच्या जागी मॉल उभारण्याचा आणि तेथील किरकोळ व्यापाऱ्यांना तेथून हटवण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. शहर स्मार्ट करण्याच्या नावाखाली ही जागा बळकावण्याचा घाट घातला जात असून आम्हालाच मालक करा आणि या मॉलमध्ये सामावून घ्या, अशी मागणी तेथील गाळेधारकांनी केली आहे. तसे न झाल्यास मॉलचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कल्याण शहराची ओळख म्हणून सांगितल्या जाणाऱ्या प्रमुख ठिकाणांपैकी लक्ष्मी मार्केट एक. ७० वर्षे जुने असलेले हे भाजीपाला-फळ मार्केट हटविण्याचे प्रयत्न पालिकेकडून सुरू आहे. भरवस्तीत, स्टेशन परिसरात कचरा होतो, या कारणास्तव मार्केट हलवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्याला व्यापाऱ्यांचा विरोध असून येथे मॉल संस्कृती आणून मराठी व्यापारी कल्याणमधून हद्दपार करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याविरोधात व्यापारी एकवटले आहेत. हे मार्केट हटविल्यास शहराची ओळख संपुष्टात येईल. तसेच हजारो कुटुंबांच्या रोजगारावर गदा येईल, याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. शिवाजी चौक ते महम्मद अली चौक या रस्त्यालगत असलेली दुकाने हटविण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतल्याने पुढच्या टप्प्यात भाजी मार्केटही जाईल, अशी भीती व्यापाऱ्यांत आहे.
लक्ष्मी मार्केटमुळे कचरा होतो, कोंडी होते, असे कारण पुढे करून महापालिकेने व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या.
वास्तविक, महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या यंत्रणेकडून योग्य प्रकारे कचरा उचलला जात नाही, असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. जेथे बाजार आहे, तेथेच कचरा होतो. व्यापारी दोन ट्रक भरून स्वत: कचरा डम्पिंग ग्राउंडला नेत होते. पण, त्या ठिकाणी जास्त कचरा आणू नका, असे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांची कोणाला अडचण नाही. आहे त्या ठिकाणीच व्यापार करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे, अशी भूमिका व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मोहन नाईक यांनी घेतली.
इतक्या वर्षांपासून आम्ही भाडे भरत आहोत. त्यामुळे कायद्यानुसार भाडेकरूच मालक झाला पाहिजे. लक्ष्मी मार्केटवर हमाल, व्यापारी, खरेदीदार, विक्रेते अशा जवळपास १० हजार लोकांचे पोटपाणी आहे. त्यात ७० टक्के मराठी माणूस आहे. मराठी माणसाला हद्दपार करून तेथे कोणी मॉल उभारण्याचा घाट घालणार असेल, तर तो प्रयत्न व्यापाऱ्यांकडून हाणून पाडला जाईल.
आयुक्त स्मार्ट सिटी करण्यासाठी १० हजार व्यापाऱ्यांना बेरोजगार करणार आहेत का? शहरातील सगळ्याच मोक्याच्या जागा स्मार्ट सिटीसाठी तोडून नागरिकांना नेमक्या अशा काय सुविधा पुरविणार आहेत, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे.

अडते व्यापार संपला, आता उरला किरकोळ व्यवहार
बाजार समितीचा कायदा अस्तित्वात आल्यावर माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी कल्याण बाजार समितीसाठी ४० एकरची जागा पत्रीपुलानजीक दिली. लक्ष्मी मार्केटमध्ये सेस वसूल करण्यासाठी आरक्षण टाकण्यात आले होते.
आरक्षणाची अधिसूचना १९८२ साली काढण्यात आली. जोवर बाजार समितीची वास्तू तयार होत नाही, तोवर हे आरक्षण कायम राहील, असे सहकार आणि पणन खात्याकडून नमूद करण्यात आले. बाजार समितीची इमारत विकसित झालेली नसल्याने अडते व्यापार लक्ष्मी मार्केटमध्ये सुरू होता.
२००९ साली बाजार समितीची इमारत विकसित झाली. त्यानंतर, लक्ष्मी मार्केटमधील अडते बाजार बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित झाला. १९८२ साली टाकण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याची अधिसूचना काढण्यात आली.
अडते व्यापार स्थलांतरित झाल्याने सध्या लक्ष्मी मार्केटमध्ये केवळ किरकोळ व्यापार चालतो. व्यापारी बाजार समितीतून होलसेल दरात भाजीपाला व फळे खरेदी करून तो लक्ष्मी मार्केटमध्ये किरकोळ दरात विकतात. बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक राजेश लव्हेकर यांनी हा निर्णय घेतला होता.

इतिहास
लक्ष्मी मार्केटचा!
70वर्षांपूर्वी कबा कानजी शेठ या नावाने हे मार्केट ओळखले जात होते. त्यानंतर, गोविंद करसन मार्केट या नावाने भाडेकरू असलेल्या व्यापाऱ्यांना भाडेपावती दिली जात होती. त्यानंतर, हे मार्केट इराणी कंपनीला विकण्यात आले. आद्रेसर इराणी या नावाने भाडेपावती मिळू लागली.

1984साली ठाण्याचे तत्कालीन महापौर नईम खान यांच्या नावे भाडेपावती येऊ लागली.

2009सालानंतर लक्ष्मी मार्केट (सन इन्फ्रा) या नावाने भाडेपावती मिळू लागली. 70 वर्षांच्या कालखंडात मार्केटचे मालक बदलत राहिले. पण, भाडेकरू तेच राहिले.

भाडेकरू व्यापाऱ्यांना भाड्याची पक्की पावती मिळत राहिली. व्यापाऱ्यांच्या चार पिढ्या या मार्केटमध्ये व्यापार करीत आहेत. साडेचार एकर जागेत हे मार्केट वसले आहे. त्यात पक्क्या भाडेकरूंची संख्या

650तर लहान-मोठ्या व्यापाऱ्यांची संख्या

200च्या घरात आहे. या मार्केटमध्ये देशाच्या सर्व भागांतून फळ व भाजीपाला माल येतो. मध्यरात्री

02वाजल्यापासून खरेदी- विक्रीला सुरुवात होते, असा तपशील लक्ष्मी भाजी मार्केट व्यापारी प्रतिनिधी आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सदस्य मोहन नाईक यांनी दिला.

Web Title: Mall on the Lakshmi Market?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.