ठाण्यात 'स्पा' च्या नावाखाली गैरकृत्य; महिलेला अटक, नौपाडा पोलिसांची कारवाई
By जितेंद्र कालेकर | Published: December 22, 2023 11:35 PM2023-12-22T23:35:32+5:302023-12-22T23:36:02+5:30
दाेन तरुणींकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांना आढळले
जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : स्पा आणि मसाजच्या नावाखाली नौपाड्यातील गजबजलेल्या भरवस्तीमध्ये सेक्स रॅकेट चालविणाऱ्या एका महिलेस अटक केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी शुक्रवारी दिली. याच स्पामधून दोन पीडित तरुणींची सुटकाही करण्यात आली आहे.
नौपाड्यातील तीन पेट्रोल पंपाजवळ भाजपचे आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयाजवळच असलेल्या शमा स्पा आणि सलूनमध्ये अनैतिक प्रकार सुरू असल्याची माहिती नौपाडा पोलिसांना मिळाली होती. ही माहिती मिळताच पोलिस निरीक्षक विद्या पाटील यांच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास बोगस ग्राहक पाठवून या ठिकाणी छापा टाकून या प्रकाराची खात्री केली. तेव्हा या ठिकाणी दाेन तरुणींकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांना आढळले. या स्पामध्ये बेडची व्यवस्थाही केली हाेती. छापेमारीमध्ये या स्पामधील कॅशकाउंटरवरील एका तरुणीला ताब्यात घेतले असून दोन पीडितांची यातून सुटका केली आहे.
स्पा च्या नावाखाली अशा प्रकारे गैरधंदा करणे हे अत्यंत चुकीचे आहे. ठाणे पोलिसांनी अशा प्रकारे शहरात कारवाईची मोहीम सुरू करणे आवश्यक आहे, असे आमदार संजय केळकर यांनी सांगितले.