माळशेजचा पर्यटक रोडावला; धबधब्यांवर पोलीस व्हॅनचा वॉच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 01:50 AM2018-07-20T01:50:08+5:302018-07-20T01:51:28+5:30
सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या फतव्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले.
सुरेश लोखंडे
ठाणे : सुरक्षेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेल्या फतव्यामुळे पर्यटकांच्या आनंदावर विरजण पडले. धबधब्यांच्या जवळपासही फिरकू दिले जात नाही. माळशेज घाटातील चारही धबधब्यांवर पोलीस व्हॅन तैनात आहेत. यामुळे येथील पर्यटक रोडावल्याचे टोकावडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी.सी. पोरे यांनी सांगितले.
माळशेजमध्ये प्रारंभीच्या पावसात पर्यटकांनी गर्दी केली. त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वीकेण्डच्या कालावधीत ४४ पोलीस कर्मचारी तैनात करावे लागले. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी विविध उपाययोजना हाती घेतल्या. यामध्ये विनाहेल्मेट, ट्रिपल सीट, घाटात दारूबंदी आदी पर्याय अमलात आणले. आतापर्यंत पन्नासपेक्षा जास्त पर्यटकांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
मद्यपींवर करडी नजर
जिल्हाधिकाºयांच्या बंदीमुळे आता शहरातील पर्यटक माळशेजमध्ये येण्यास नेहमीप्रमाणे धजावत नाहीत. घाटातील महामार्गावर पोलिसांची सतत पेट्रोलिंग आहे. याशिवाय, घाटातील चार मोठ्या धबधब्यांच्या परिसरात पोलीस व्हॅन तैनात केलेल्या आहेत. घाटात शिरण्याआधी पोलिसांकडून तपासणी होत आहे. मद्यसाठा बाळगण्यास आधीच मनाई आहे.
तीन अधिका-यांचे पथक
धबधब्यांवर जिल्हाधिकाºयांच्या प्रतिबंधात्मक नोटीसचे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. त्यात दरडी कोसळण्याच्या दोन घटना मागील आठवड्यात अंतराने घडल्या. या घटनांमुळे वाहतूक मोठ्या प्रमाणात थंडावली. महिला पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तीन पोलीस अधिकाºयांचे पथक घाटात तैनात असल्यामुळे मनमानी पर्यटकांना आळा घालणे शक्य झाल्याचे पोरे यांनी सांगितले आहे.