VIDEO : ठाण्याची मिसळ ‘मामलेदार’; मुख्यमंत्र्यांसह आमदारांनी घेतला मिसळ पावचा आस्वाद
By जितेंद्र कालेकर | Published: November 12, 2023 08:09 PM2023-11-12T20:09:21+5:302023-11-12T20:10:12+5:30
...अन् सकाळच्या नाष्ट्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा तहसिलदार कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ‘मामलेदार मिसळ’ कडे वळविला.
ठाणे : ठाण्यातील मासुंदा तलाव भागातील दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत ठाणेकरांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सकाळच्या नाष्ट्यासाठी मुख्यमंत्र्यांनी आपला मोर्चा तहसिलदार कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ‘मामलेदार मिसळ’ कडे वळविला. कोणत्याही विषयावर फारशी चर्चा न करता ओवळा माजीवड्याचे आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक आणि शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह खवय्ये मुख्यमंत्री शिंदें यांनी मिडियम मिसळ तरी पाववर चांगलाच ताव मारला.
एरव्ही, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज नेते मंडळी आणि सिने कलाकारांनी मामलेदारच्या मिसळचा आस्वाद घेतला आहे. राष्ट्रवादीचे नेते स्व. वसंत डावखरे आणि शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख स्व. आनंद दिघे यांनीही या मिसळीची चव चाखली आहे.
मुख्यमंत्री शिंदे हेही मामलेदारमध्ये मिसळीचा आस्वाद घेण्यासाठी अधूनमधून येतात. परंतू, ते थेट हाॅटेलमध्ये येण्याऐवजी बाजूच्याच एका दुकानाच्या कॅबिनमध्ये मिसळ मागवून घेतात. असे या दुकानाचे मालक दामोदर मुरडेश्वर यांचे पुतणे आदित्य यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
ठाण्याची मिसळ ‘मामलेदार’; मुख्यमंत्र्यांसह आमदारांनी घेतला मिसळ पावचा आस्वाद#EknathShinde#ShivSena#MLApic.twitter.com/kxd58dv2NC
— Lokmat (@lokmat) November 12, 2023
सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांचा ताफा मामलेदार मिसळमध्ये दाखल झाला. त्यावेळी हॉटेलच्या बाहेर आणि आतही ग्राहकांसह मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेल्या ठाणेकरांची त्यांना पाहण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. मुख्यमंत्र्यांच्या बाजूलाच बसलेले आमदार सरनाईक, समोरच्या बाकडयावरील रवींद्र फाटक आणि माजी महापौर नरेश म्हस्के अशा चाैघांसाठी टेबलवर चार मिडियम मिसळ पाव मागविण्यात आले. दरम्यानच्या काळात एक्ट्रा पाव मागवित या चार व्हीआयपी गिऱ्हाईकांनी मिसळीची चव चाखली. या दरम्यान हॉटेलमध्ये हाेणारी गर्दी पाहून मुख्यमंत्र्यांनीच कार्यकर्त्याच्या भूमीकेतून ‘आतल्या लोकांनी बाहेर जा, बाहेरच्या लोकांनी आत या’, अशा सूचना केल्या. त्याबरोबर लोकही पटापट बाजूला झाली. या काळात तारांबळ उडाली ती मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा रक्षकाची. कोणाला हॉटेलमध्ये शिरु द्यायचे आणि कोणालाही शिरु द्यायचे नाही, याचा पेच त्यांच्यासमोर होता. तर इकडे हॉटेलच्या गल्ल्यावर बसलेले मामलेदार मिसळचे मालक दामोदर मुरडेश्वर यांच्या चेहऱ्यावर मात्र समाधानाचे वेगळेच भाव पहायला मिळाले.
यावेळी अनेकांनी मुख्यमंत्र्यांसमवेत सेल्फीही काढला. मिसळवर ताव मारल्यावर मुख्यमंत्र्यांनी पदाधिकारी आणि काही कार्यकर्त्यांचे सुमारे दोन हजारांचे रितसर बिल अदा करुन पुढच्या दाैऱ्याला मार्गस्थ झाले. त्यांनी बिल अदा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ताफा तिथून गेला. मात्र , त्यांच्या तल्लपीमुळे ठाण्याची ही मिसळ खऱ्या अथार्ने ‘मामलेदार’ झाल्याची चांगलीच चर्चा रंगली होती.