सुप्रसिद्ध 'मामलेदार मिसळ'चे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2020 02:59 PM2020-12-01T14:59:00+5:302020-12-01T16:00:25+5:30

'मामलेदार मिसळी'ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक ओळख मिळवून देण्यात लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती.

mamledar misal owner laxman murdeshwar passed away | सुप्रसिद्ध 'मामलेदार मिसळ'चे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन

सुप्रसिद्ध 'मामलेदार मिसळ'चे सर्वेसर्वा लक्ष्मण मुर्डेश्वर यांचे निधन

Next
ठळक मुद्देराज ठाकरेंसह अनेक राजकारणी, कलाकार मामलेदार मिसळीचे चाहतेमहाराष्ट्राची मिसळ जागतिक पातळीवर नेण्यात लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं योगदानमामलेदार मिसळीची महाराष्ट्रासह संपूर्ण जगभरात ख्याती

ठाणे
महाराष्ट्राचे 'मिसळसम्राट' अशी ख्याती असलेले सुप्रसिद्ध 'मामलेदार मिसळ'चे मालक लक्ष्मण मुर्डेश्वर यांचं आज निधन झालं आहे. ते ८४ वर्षांचे होते. अल्पशा आजारामुळे गेल्या १५ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते.  'मामलेदार मिसळ' हा ठाण्याचा ब्रँड त्यांनी निर्माण केला.

'मामलेदार मिसळी'ला केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जागतिक ओळख मिळवून देण्यात लक्ष्मण मुर्डेश्वर यांनी प्रचंड मेहनत घेतली होती. मूळचे कर्नाटकचे असलेल्या मुर्डेश्वर यांनी ठाण्यात १९४६ साली तहसील कार्यालयाबाहेर 'मामलेदार मिसळ' सुरू केली होती. त्यानंतर आज 'मामलेदार मिसळ' हा एक ब्रँड झाला आहे. ठाण्यातील खाद्य ते मिष्टान्न विक्रेता संघाचे २७ वर्ष ते खजिनदार होते.

लक्ष्मण मुर्डेश्वर त्यांचे वडील नरसिंह मुर्डेश्वर यांच्यासह मुंबईत आले तेव्हा ते केवळ ४ वर्षांचे होते. ठाण्यात आल्यानंतर त्यांच्या वडिलांनी उद्योग करावा, या हेतून आजचे तहसीलदार कार्यालय म्हणजेच त्यावेळच्या मामलेदार कचेरीच्या बाहेरची जागा शासनाकडून भाड्याने घेतली आणि तिथे कँटीन सुरू केले होते. मात्र, काही वर्षांनी म्हणजे १९५२ साली त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे व्यवसायाची संपूर्ण जबाबदारी लक्ष्मण मुर्डेश्वर यांच्यावर आली. तेव्हापासून ते कँटीन चालवत होते. मामलेदार मिसळीला आज ७० वर्षांहून अधिक काळ झाला आहे. 

कलाकार ते राजकारणी मंडळी मामलेदार मिसळीचे चाहते
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे 'मामलेदार मिसळी'चे चाहते आहेत. गेल्याच वर्षी कल्याण आणि भिवंडीमध्ये पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतल्यानंतर मुंबईच्या दिशेने परतताना राज ठाकरे यांनी मामलेदार मिसळीचा आस्वाद घेतला होता. यावेळी अमित ठाकरे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी दुकानाबाहेर राज समर्थकांची प्रचंड गर्दी झाली होती. राज यांच्यासोबतच नारायण राणे देखील ठाण्यात असले की मामलेदार मिसळ आवर्जुन मागवून घेतात. इतकेच नव्हे, तर विधीमंडळाच्या अधिवेशनातही नारायण राणे ५०० ते ६०० प्लेट मिसळ थेट मुंबईला मागवून घ्यायचे आणि सर्व मंत्री, आमदार आणि अधिकाऱ्यांना मेजवानी द्यायचे.  अनेक कलाकार मंडळीही देखील मामलेदार मिसळ चाखण्यासाठी येत असतात. ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये प्रयोगासाठी येत असताना 'मामलेदार मिसळ'चा आस्वाद घेण्यासाठी अनेक कलाकार आवर्जुन येत असतात.

Web Title: mamledar misal owner laxman murdeshwar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.