पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: July 5, 2023 21:12 IST2023-07-05T21:12:49+5:302023-07-05T21:12:56+5:30
श्रीनगर पोलिसांची कारवाई: पोलिस कोठडीत रवानगी

पूर्ववैमनस्यातून तरुणाच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्यास अटक
ठाणे: पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून वागळे इस्टेट, किसन नगर क्रमांक तीन भागातील रहिवासी असलेल्या महेश चलवादी (२१) या तरुणावर चाकूने खुनी हल्ला करणाऱ्या शंकर बोरा (२१, रा.वैशालीनगर, मुलुंड, मुंबई) याला श्रीनगर पोलिसांनी अटक केली. त्याची रवानगी पोलिस कोठडीत केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली.
किसन नगर भागातील रहिवासी महेश याच्या घरासमोर आरोपी शंकर बोरा हा ३ जुलै, २०२३ रोजी रात्री १०.२५ वाजण्याच्या सुमारास आला. त्याने पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातून महेशला शिवीगाळ केली. त्यानंतर, कमरेला खोचलेला मोठा सुरा काढून, त्याने महेशवर वार करीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न केला.
श्रीनगर पोलिस ठाण्यात ४ जुलै रोजी पहाटे ५.३५ वाजण्याच्या सुमारास खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता. याची गांभीर्याने दखल घेत, वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरणकुमार काबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील शिंदे आणि उपनिरीक्षक नितीन हांगे यांच्या पथकाने आरोपी शंकर बोरा याला अवघ्या काही तासांमध्येच अटक केली. त्याला दोन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले.