जबरी चोरी झाल्याचा बनाव करुन 5 लाखांचा अपहार करणाऱ्या भामटयास अटक
By जितेंद्र कालेकर | Published: January 6, 2023 08:45 PM2023-01-06T20:45:44+5:302023-01-08T14:34:59+5:30
चितळसर पोलिसांची कारवाई: पाच लाखांची रोकड हस्तगत
ठाणे: जबरी चोरी झाल्याचा बनाव करुन पाच लाखांचा अपहार करणाºया वैभव शिंदे (२७, रा. लक्ष्मी चिरागनगर,ठाणे) याला अटक केल्याची माहिती चितळसर पोलिसांनी शुक्रवारी दिली. त्याच्याकडून अपहारातील पाच लाखांची रोकडही अवघ्या काही तासांमध्ये हस्तगत केली आहे. नवनीत नेटवर्क सोल्यूशन्स या कंपनीची पाच लाखांची रोकड बँक आॅफ बडोदामधून काढून वैभव हा ४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास त्याच्या स्कूटरवरुन जात होता.
त्यावेळी कापूरबावडी नाक्यावरील हायस्ट्रीट मॉल येथे चार अनोळखींनी डोळयात मिरचीची पूड टाकून त्याच्याकडील पाच लाखांची रोकड जबरीने लुटल्याची तक्रार त्याने चितळसर पोलिस ठाण्यात केली. त्यानुसार याप्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्याने दिलेली माहिती आणि घटनास्थळावरील सीसीटीव्ही फूटेजच्या चित्रणामध्ये बºयाच विसंगती पोलिसांना आढळल्या. शिवाय, वैद्यकीय अहवालातही डोळयात कोणत्याही प्रकारचा मसाल्याचा पदार्थ पोलिसांना आढळला नाही.
त्याच्या अंगावरही कोणत्याही जखमा नव्हत्या. त्याने केलेल्या फोनचीही माहिती घेण्यात आली. त्यानुसार त्याने दिलेल्या सर्वच माहितीमध्ये विसंगती आढळली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीश गोडे आणि राघवेंद्र भिलारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सुनिल वाघ यांच्या पथकाने कसून चौकशी केल्यानंतर त्याने जबरी चोरी झाल्याचा बनाव केल्याची कबूली दिली. त्यानंतर ५ जानेवारी रोजी सायंकाळी त्याच्याकडून अपहारातील ही पाच लाखांची रोकडही हस्तगत केली. त्याला एक दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले. या अपहारातील पैशातून नोकरी सोडून व्यवसाय करण्याच्या विचारातून हा प्रकार केल्याचेही त्याने चौकशीमध्ये पोलिसांना सांगितले.