पूर्वीच्या भांडणातून फिरस्त्याचा खून करणाऱ्याला अटक

By जितेंद्र कालेकर | Updated: March 14, 2025 16:59 IST2025-03-14T16:58:53+5:302025-03-14T16:59:17+5:30

कळवा पोलिसांची कामगिरी: नऊ तासात गुन्ह्याची उकल.

Man arrested for murdering neighbor over previous dispute | पूर्वीच्या भांडणातून फिरस्त्याचा खून करणाऱ्याला अटक

पूर्वीच्या भांडणातून फिरस्त्याचा खून करणाऱ्याला अटक

जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पूर्वीच्या भांडणाचा वचपा काढण्यासाठी डोक्यात सिमेंट काँक्रीटच्या दगडाने हल्ला करुन
झोपेत असलेल्या अनिल बेहरा (३२, रा. कळवा) या फिरस्त्याचा खून करणाऱ्या संतोष लाड (४५, रा. विटावा, ठाणे) याला अटक केल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुभाष बुरसे यांनी शुक्रवारी दिली. त्याच्या कपडयांवर उडालेल्या रक्ताच्या डागामुळे तो कळवा पोलिसांच्या हाती लागला. अवघ्या नऊ तासांमध्ये या खूनाची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

कळव्यातील राजा गवारी खुला रंगमंच, विटावा येथील एका अनोळखीचा खून झाल्याची माहिती ७ मार्च २०२५ रोजी कळवा पोलिसांना सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस आयुक्त उत्तम कोळेकर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष पिंपळे यांच्या पथकाने घटनास्थळी पाहणी केली. तेंव्हा सुमारे ३२ ते ३५ वयोगटातील अज्ञात अनोळखीचा झोपेतच कोणीतरी असतांना सिमेंटचा दगड मारून, खून केल्याचे आढळले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) नुसार खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सार्वजनिक ठिकाणी झोपलेल्या या फिरत्याच्या डोक्यात दगड मारल्याने गंभीर दुखापतीमुळे मोठया प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता. त्याची ओळख पटविणेही अवघड झाले होते. रात्री उशिराचा हा प्रकार असल्याने तसेच जवळचे सीसीटीव्हीही बंद असल्याने हा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. घटनास्थळी पोलिसांच्या पथकाने केलेल्या पाहणीमध्ये कपडयांमध्ये एक मोबाईल आढळला. त्याच आधारे अनिल बेहरा मुळ रा. उत्तराखंड अशी त्याची ओळख पटली. महाराष्ट्र राज्यात त्याचे कोणीही नातेवाईक नसून तो कळवा परिसरात फिरस्ता असल्याचेही स्पष्ट झाले.

हा तपास सुरु असतांनाच या भागातील एका व्यक्तीच्या कपडयांवर रक्ताचे डाग असल्याची माहिती एका खबºयाने पोलिस पथकाला दिली. त्याच आधारे संतोष लाड या संशयिताला ताब्यात घेण्यात आले. त्याला ‘बोलते’ केल्यानंतर अनिल याच्याशी पूर्वी झालेल्या भांडणाच्या रागातूनच रात्रीच्या वेळी तो झोपेत असतांना त्याच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची कबूली दिली. खुनाच्या घटनास्थळापासून काही अंतरावरील सीसीटिव्ही फुटेजमध्येही संतोष दगड शोधत असल्याचे स्प्ष्ट आढळले. त्यावरूनच अखेर संतोष याला ७ मार्च रोजी अटक करण्यात आली. त्याची पोलीस कोठडीत रवानगी केल्याची माहिती कळवा पोलिसांनी दिली.

Web Title: Man arrested for murdering neighbor over previous dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.