आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्यास अटक
By जितेंद्र कालेकर | Updated: December 22, 2024 23:40 IST2024-12-22T23:40:05+5:302024-12-22T23:40:23+5:30
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कामगिरी: दाेन लाखांच्या गाेळया हस्तगत

आयुर्वेदिक औषधांच्या नावाखाली भांगेच्या गोळ्यांची तस्करी करणाऱ्यास अटक
जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आयुर्वेदिक औषधाच्या नावाखाली भांगेच्या गाेळयांची तस्करी करणाऱ्या जितेंद्र कामता प्रसाद जैस्वाल याला ठाणे जिल्ह्यातील भाईंदर येथून उत्पादन शुल्क विभागाने अटक केल्याची माहिती ठाण्याचे अधीक्षक प्रविण तांबे यांनी रविवारी दिली. त्याच्याकडून दोन लाखांहून अधिक रुपयांच्या भांगेच्या गोळ्यांचा साठा जप्त केला आहे. हा साठा जैस्वाल याने रेल्वेने उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यातून नववर्षाच्या स्वागताच्या नावे ठाणे, पालघर जिल्ह्यातील पान टपऱ्यांवर नशेसाठी विक्रीसाठी आणल्याचा प्राथमिक अंदाज राज्य उत्पादन शुल्क विभागाने वर्तवला आहे.
भाईंदर येथील घरात भांगेचा साठा आणल्याची माहिती ठाणे विभागाचे उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी रत्नाकर शिंदे यांना खबऱ्याकडून मिळाली हाेती. त्याच आधारे काेकण विभागीय उपायुक्त प्रदीप पवार आणि ठाण्याचे अधीक्षक प्रवीण तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे यांनी अमजद तडवी, प्रशांत दळवी आणि शुभम माळी या कर्मचाऱ्यांसाेबत भाईंदर येथील एका संकुलातील घरामध्ये २१ डिसेंबर २०२४ राेजी छापा टाकला. त्या छाप्यात सुमारे दाेन लाख २३ हजार ६८० रुपये किमतीचा साठा आढळला. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन जैस्वाल याला अटक केली.