ठाण्यात वाहनांमधील बॅटऱ्यांची चोरी करणा-यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2020 11:25 PM2020-10-11T23:25:45+5:302020-10-11T23:27:56+5:30
वाहनांमधील बॅटऱ्यांची चोरी करणा-या बबलू सुरेंद्र गुप्ता (२७, रा. कोलबाड रोड, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. दोन ते तीन हजारांच्या या बॅट-यांची सहाशे ते सातशे रुपयांमध्ये तो विक्री करीत होता, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: रिक्षा, बस तसेच इतर वाहनांमधील बॅट-यांची चोरी करणा-या बबलू सुरेंद्र गुप्ता (२७, रा. शेलारपाडा, कोलबाड रोड, ठाणे) याला नौपाडा पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. त्याला २० आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
खोपट येथील एसटी कार्यशाळेजवळून नौपाडा पोलिसांचे पथक हे ७ आॅक्टोबर रोजी रात्री ८.३५ वाजण्याच्या सुमारास गस्त घालीत होते. त्यावेळी ताडपत्री लावलेल्या एका रिक्षातून बबलू बॅटरी काढत असतांना शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक विनोद लबडे, पोलीस नाईक सुनिल राठोड, साहेबराव पाटील आणि गोरख राठोड आदींच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले. पप्पू नामक आपल्या अन्य एका साथीदाराच्या मदतीने शहरातील विविध भागातील वाहनांमधील बॅट-यांची चोरी करीत असल्याची कबूली त्याने दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले आणि रवींद्र क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने केलेल्या चौकशीमध्ये त्याने इतरही चो-यांची कबूली दिली. आॅगस्ट २०२० मध्ये नितीन कंपनीजवळील एक बॅट-यांच्या दुकानातही त्याने चोरी केली होती. तर ठाणे महापालिका भवनासमोरील एका टीएमटी बसमधून तसेच एका टँकरमधूनही त्याने बॅटरीची चोरी केल्याचे चौकशीत समोर आले. दोन ते तीन हजारांच्या या बॅटºयांची सहाशे ते सातशे रुपयांमध्ये तो विक्री करीत होता, अशी माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.