उत्तर प्रदेश येथून २० वर्षांपूर्वी हरवलेल्या व्यक्तीचा मुंबईत लागला शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 6, 2020 10:22 PM2020-01-06T22:22:40+5:302020-01-06T22:30:53+5:30
उत्तर प्रदेशातील फतेहपूरसिक्री येथून २० वर्षांपूर्वी हरवलेल्या मोहंमद अहमद ऊर्फ दिल्ली बशीर शेख (३३) याचा शोध घेण्यात ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाला यश आले आहे. त्यामुळे मुंबईतच राहणाऱ्या त्याच्या भावाशी भेट घडवून आणण्यातही ठाणे पोलिसांनी मोलाची कामगिरी बजावली.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळवा येथील गोळीबार प्रकरणाचा ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून शोध सुरू असताना २० वर्षांपूर्वी उत्तर प्रदेशातील फतेहपूरसिक्री येथून हरवलेल्या मोहंमद अहमद ऊर्फ दिल्ली बशीर शेख (३३) याचा शोध घेण्यात युनिट-१ च्या पथकाला शनिवारी यश आले. त्यामुळे मुंबईतच राहणा-या त्याच्या भावाशी भेट घडवून आणण्यात ठाणे पोलिसांना यश आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले आहे.
कळवा पूर्व येथील शिवाजीनगर भागातील वीर युवराज मेडिकलमध्ये दरोडा टाकण्यासाठी २८ डिसेंबर २०१९ रोजी पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास एका चोरट्याने मेडिकलचे शटर उचकटून शिरकाव केला. त्यानंतर, दुकानातील एका कर्मचाºयाचा खून करून या चोरट्याने तिथून पलायन केले. याच प्रकरणाच्या तपासातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा माहीम दर्गा, मुंबईपर्यंत वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अविराज कुºहाडे, समीर अहिरराव आणि पोलीस हवालदार आनंदा भिलारे आदींच्या पथकाने माग काढला. तेव्हा माहीम दर्गा परिसरात राहणाºया स्थानिक रहिवाशांनी या सीसीटीव्ही फुटेजमधील संशयित आरोपी हा दोन वर्षांपूर्वी माहीम दर्गा भागात राहणारा ‘दिल्ली’नामक व्यक्ती असल्याचा दावा केला. त्याच अनुषंगाने या पथकाने दिल्ली याचा बांद्रा, दादरसह इतर ठिकाणी शोध घेतला. तो काही दिवसांपूर्वी मुंबईच्या वाकोला परिसरातील ब्रिजखाली दिसल्याचे अनेक रहिवाशांनी सांगितले. त्याप्रमाणे वाकोला ब्रिज परिसरात त्याचा शोध घेतला असता, तो या भागात ४ जानेवारी रोजी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ब्रिजखाली मिळाला. मात्र, त्याचा कळव्यातील मेडिकलमधील गोळीबार प्रकरणाशी संबंध नसल्याचे सहायक पोलीस निरीक्षक कुºहाडे यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत आढळले. तो २० वर्षांपूर्वी मूळ गावाहून मुंबईत पळून आलेला होता. लहानपणी त्याच्या फतेहपूरसिक्री जिल्ह्यातील जनता (ता. बेनकी) येथून पळून आल्याचेही पोलिसांनी विश्वासात घेतल्यानंतर त्याने सांगितले. त्याने मूळगावी आईवडिलांकडे जाण्याचीही इच्छा या पथकाकडे व्यक्त केली. तेव्हा उत्तर प्रदेश येथील स्पेशल टास्क फोर्सच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्फतीने दिल्ली याच्या मूळ गावी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर, त्याचा मोठा भाऊ शफीक शेख (रा. शिवाजीनगर, गोवंडी, मुंबई) या परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती समोर आल्यानंतर त्याला ठाण्यातील युनिट-१ च्या कार्यालयात बोलावून त्याची ओळख पटविण्यात आली. तो आपलाच लहान भाऊ असल्याचे शफिकने ओळखले. आपल्या लहान भावाचा सांभाळ करण्याची जबाबदारीही त्याने घेतल्यानंतर ठाणे पोलिसांनी दिल्ली हुसेन याला त्याच्या भावाच्या ताब्यात दिले. एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करताना, समांतरपणे मानवतावादी दृष्टिकोन जपल्याने बेपत्ता व्यक्तीच्या नातेवाइकांनी ठाणे पोलिसांचे आभार मानले आहेत.