ठाण्यातील खाडीकिनाऱ्याची खारफुटी काळवंडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 12:01 AM2019-10-18T00:01:00+5:302019-10-18T00:02:00+5:30
मँग्रोव्ह मॉथ कॅटरपिल्लरचा प्रादुर्भाव : वातावरणबदलाचा परिणाम
- पंकज रोडेकर
ठाणे : खाडीकिनाºयाची खारफुटी दिवसेंदिवस नष्ट होत असून त्या ठिकाणी येणाºया पक्ष्यांची संख्याही कमी होऊ लागली आहे. तेथे पक्ष्यांसाठी तयार होणाºया खाद्यपदार्थांचे प्रमाण मुबलक आहे. पण, तेथे वृक्षतोडीमुळे पक्षी येत नाहीत. त्यामुळे मॅँग्रोव्ह मॉथ या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढल्याने ठाणे खाडीकिनाºयाची खारफुटी सद्य:स्थितीत काळवंडू लागली आहे. हा परिणाम वातावरणातील बदलाचा असल्याचे मत पर्यावरणतज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. अशाच प्रकारातून नवी मुंबईतील सीवूड परिसरात खारफुटी सोडून अन्य वृक्षांवर बसलेल्या सुरवंटांनी रस्त्यावरील वाहनचालकांवर हल्ला केल्याचा अंदाज आहे.
ठाण्याला कोपरीपासून कळवा, बाळकुम ते थेट गायमुख असा खाडीकिनारा लाभला आहे. यातील कोपरी आणि कळवा परिसरात असलेल्या खाडीकिनाºयाची खारफुटीची झाडे मोठ्या प्रमाणात काळवंडण्यास सुरुवात झाली आहे. आॅक्टोबर महिना हा हीटचा म्हटला जात असला, तरी या किनाºयावरची खारफुटीची झाडे ही वेगळ्या कारणांनी काळवंडली आहे. या झाडांवर मँग्रोव्ह मॉथ कॅटरपिल्लर या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाल्याने खाडीच्या एका टोकापासून दुसºया टोकाकडे पाहिल्यावर झाडे काळवंडल्याचे दिसत आहे. या अळ्या प्रामुख्याने सप्टेंबर महिन्यात येतात. मात्र, यंदा त्या आॅक्टोबर महिन्यात आल्याने खारफुटीची झाडे काळवंडली आहेत. त्या प्रामुख्याने झाडांच्या पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे ही झाडे काळवंडली आहेत. हा प्रादुर्भाव पाहून झाडेच आपली पाने गाळण्यास सुरुवात करतात. या अळ्या हळूहळू खाडीकिनाºयाच्या इतर झाडांवर दिसून येत आहेत. मानवी वस्तीत झाडांवर हवेत तरंगताना त्या लोकांच्या अंगावर पडतात. ती चावल्यास अंगावर चट्टे उठतात. त्यामुळे नागरिकांनी तेथे जाणे टाळावे, अथवा अंगभर कपडे परिधान करावेत, असे तज्ज्ञांनी सांगितले.
ही अळी लष्करी अळीसारखीच
शेतात येणाºया लष्करी अळीप्रमाणेच मँग्रोव्ह मॉथ कॅटरपिल्लर ही अळी प्रामुख्याने झाडांच्या पानांवर हल्ला करते. त्यामुळे झाडाची पाने सुकतात. हळुहळु झाडाची पानेही गळू लागतात. मात्र अळींचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर झाडांना लगेचच नवीन पालवी फुटते.
हा प्रकार गंभीर आहे. याला आपणच सर्वजण जबाबदार आहोत. वातावरणात सातत्याने होणाºया बदलामुळे हा प्रकार वाढल्याचे दिसत आहे. या अळ्या प्रामुख्याने पावसाळ्यात येतात. पावसाबरोबर त्या झाडांवरून जमिनीवर पडल्यावर त्यांचे सुरवंट होते. त्यांचे कोष निर्माण झाल्यावर ते फुलपाखरू होते. एखाद्या जीवनसाखळीतील एक घटक कमी झाल्यावर त्याचा परिणाम होतो. त्याचप्रमाणे त्याचा परिणाम सध्या दिसत आहे.
- डॉ. नागेश टेकाळे, पर्यावरणतज्ज्ञ