बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्यानं महिलेवर ज्वालाग्राही रसायन फेकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2020 11:09 PM2020-02-04T23:09:56+5:302020-02-04T23:13:04+5:30

गुजरातच्या अहमदाबादमधून आरोपी ताब्यात

man throws Flammable chemical on women for rejecting his demand to withdraw rape case | बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्यानं महिलेवर ज्वालाग्राही रसायन फेकलं

बलात्काराचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्यानं महिलेवर ज्वालाग्राही रसायन फेकलं

Next

मीरारोड - बलात्काराचा दाखल गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने आरोपीने एका २६ वर्षीय पीडित महिलेच्या अंगावर ज्वलनशील द्रव्य फेकल्याची घटना काशिमीरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. पोलिसांनी आरोपीला सोमवारी गुजरातच्या अहमदाबादमधून ताब्यात घेतले आहे.

सदर महिला आपली दोन मुलं व बहिणीच्या मुलांसह राहते. शुक्रवारी रात्री महिला मुलांचे नाश्त्याचे साहित्य व औषधे विकत घेऊन पायी घरी चालली होती. रात्री १०.३० च्या सुमारास महिला अदानी पॉवर सब स्टेशनकडून एकटीच चालली असताना नया नगर भागात राहणारा आरोपी त्याच्या मित्रासोबत दुचाकीने आला. काशिमीरा पोलीस ठाण्यात दाखल केलेला बलात्काराचा गुन्हा मागे घे. तसे स्टॅम्प पेपर लिहून दे, अशी धमकी आरोपीने दिली. मात्र महिलेने सही करण्यास आणि तक्रार मागे घेण्यास नकार दिला. यानंतर तुला बघून घेईन, अशी धमकी त्याने दिली. 

पीडित महिला तिथून जाऊ लागली असताना एकाने तिच्या अंगावर ज्वालाग्रही द्रव्याने भरलेली बाटली फोडली. तिने आरडाओरडा केल्याने ते दोघे हल्लेखोर हाटकेशच्या दिशेने पळून गेले. त्या बाटलीत पेट्रोल व रॉकेलसारखे ज्वालाग्रही रसायन असल्याने ते तिच्या अंगावर पडून डोळ्याची खूपच जळजळ होऊ लागली. यानंतर तिला काहींनी काशिमीरा पोलीस ठाण्यात नेले. पोलिसांनी उपचारासाठी भार्इंदरच्या भिमसेन जोशी रुग्णालयात दाखल केले. 

दरम्यान या घटनेची पोलीसांनी गांभीर्याने दखल घेतली. वरिष्ठ निरीक्षक संजय हजारे यांनी आरोपीला अटक करण्यासाठी तातडीने तपास सुरु करुन पथके रवाना केली. यातील महिलेच्या फिर्यादीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल असलेला मुख्य आरोपी हा गुजरातच्या अहमदाबाद येथे असल्याचे कळताच पोलीसांनी त्याला तेथुन सोमवारी पकडून आणले. आज मंगळवारी त्याला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आले. उपनिरीक्षक अमित पाटील पुढील तपास करत आहेत.

Web Title: man throws Flammable chemical on women for rejecting his demand to withdraw rape case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.