अनैतिक संबंधांतून खून करणाऱ्या तरुणाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 12:59 AM2019-01-22T00:59:57+5:302019-01-22T01:00:11+5:30
डोक्यात प्रहार करून नंतर तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणा-या अबरार शेख (३८, रा. नालासोपारा) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे.
ठाणे : अनैतिक संबंधांतून निर्मला सचिन यादव (४८, रा. नालासोपारा, जि. पालघर) हिचा डोक्यात प्रहार करून नंतर तिचा मृतदेह जाळून पुरावा नष्ट करणा-या अबरार शेख (३८, रा. नालासोपारा) याला ठाणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी अटक केली आहे. कोणताही धागादोरा नसताना अर्धवट जळालेल्या एका कागदावरील मजकुराच्या आधारे पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.
नालासोपारा येथील मराठी भाषिक निर्मलाचा मूळच्या उत्तर प्रदेशातील सचिन यादव याच्याशी विवाह झाला होता. नालासोपाºयामध्येच तिचे किराणा मालाचे दुकान आहे. याच दुकानामध्ये सिगारेटखरेदीसाठी येणाºया अबरारशी तिची ओळख झाली. त्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी अनैतिक संबंध ठेवले होते. तिने लग्नाचा तगादा लावल्यानंतर तो तिला टाळू लागला. १५ जानेवारी रोजी ती पुण्याला जाण्यासाठी निघाली, तेव्हा त्याने तिला ठाण्याच्या घोडबंदर रोडवर बोलावून घेतले. तिथे गप्पा मारण्याच्या नावाखाली तिला जंगलात फिरायला नेले. निर्जनस्थळी त्याने तिचा खून केला. नंतर, तिचा मृतदेह जाळल्यानंतर तिथून पलायन केले. १६ जानेवारी रोजी काशिमीरा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक गणेश ढाकणे हे घोडबंदर खिंड येथे गस्त घालत असताना त्यांना एका रहिवाशाने याबाबत माहिती दिली. त्यानुसार काशिमीरा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अमित पाटील यांनीही घटनास्थळी पाहणी करून गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी हा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्याकडे सोपवला. सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि उपनिरीक्षक अभिजित टेलर यांनी घटनास्थळी मिळालेल्या एका चिटोºयाच्या आधारे या महिलेच्या पतीचा शोध घेतला. त्याने अर्धवट जळालेले कपडे आणि पैंजणांच्या आधारे तो मृतदेह त्याची पत्नी निर्मलाचा असल्याचे सांगितले. त्यानंतर, तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे अबरारसोबत ती तिथे आल्याचे उघड झाले. तो गुलबर्गा (कर्नाटक) येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. तत्पूर्वी, सोमवारी सायंकाळी त्याला अटक केली. तो विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.