खांडपे गावाचा कारभार तरुणीच्या हाती; अक्षता वाघचौडे झाली सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 01:59 AM2021-02-07T01:59:33+5:302021-02-07T02:00:04+5:30
तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून खांडपे गावाची ओळख आहे. या गावात प्रत्येक घरातील एक ते दोन व्यक्ती या सरकारी नोकरीत आहे. तर, काही जण हे स्वतंत्र व्यवसाय करतात.
मुरबाड : तालुक्यात सर्वात लहान वयात सरपंच होण्याची संधी खांडपे येथील अक्षता मदन वाघचौडे या २४ वर्षीय तरुणीस मिळाली आहे. ती या गावाची कारभारीण म्हणून काम पाहणार आहे.
तालुक्यातील एक आदर्श गाव म्हणून खांडपे गावाची ओळख आहे. या गावात प्रत्येक घरातील एक ते दोन व्यक्ती या सरकारी नोकरीत आहे. तर, काही जण हे स्वतंत्र व्यवसाय करतात. हे गाव राजकारणापासून कोसो दूर असून या गावात होणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुका या ग्रामस्थांच्या सहकार्याने बिनविरोध पार पडल्या जातात. गावाच्या विकासासाठी योग्य उमेदवाराला संधी दिली जाते.
नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये अक्षता हिच्या अंगी असणारे कौशल्य व महिला संघटना तसेच गावाच्या विकासासाठी भविष्यात राबविण्यात येणाऱ्या योजनांची कशा प्रकारे अंमलबजावणी करावी, याचे योग्य पद्धतीने नियोजन केले होते. याचा ग्रामस्थांनी विचार करून अक्षता हिला बिनविरोध निवडून दिले. मात्र, त्यावेळी सरपंचपदाचे आरक्षण पडलेले नसल्यामुळे सर्व ग्रामस्थ अक्षता हिला सरपंचपदाची संधी कशी मिळेल, या प्रयत्नात होते. बुधवारी झालेल्या सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीत खांडपे गावात अनुसूचित जातीसाठी आरक्षण जाहीर झाल्याने तिचा सरपंचपदाचा मार्ग मोकळा झाला. गावाच्या विकासासाठी तरुण कारभारीण लाभली म्हणून ग्रामस्थांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
माझे गाव हे सुशिक्षित, सुसंस्कृत असून ते राजकारणविरहित गाव म्हणून तालुक्यात परिचित आहे. ते समस्यामुक्त व विकसित गाव म्हणून ठाणे जिल्ह्यातील एक आदर्श गाव करण्याचा माझा प्रयत्न राहील. - अक्षता वाघचौडे, सरपंच, खांडपे