फी माफ : मनविसेच्या दबावाने व्यवस्थापन नमले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 11:26 PM2020-09-30T23:26:38+5:302020-09-30T23:26:53+5:30
फी माफ : लॉकडाऊनमुळे पालकांची परिस्थिती बिकट
भिवंडी : कोरोनामुळे शाळांची फी भरण्यास पालकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. मात्र शाळांनी फी वसुलीचा तगादा लावल्याने शाळा व्यवस्थापननाने लॉकडाऊनच्या काळातील विद्यार्थ्यांची फी माफ करावी या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने शाळा व्यवस्थापनाकडे मागणी लाऊन धरली होती. अखेर शाळा व्यवस्थापनाने नव्या शैक्षणिक वर्षातील जुलै व आॅगस्ट महिन्याची फी न घेण्याचा निर्णय घेतला आहे.यामुळे तब्बल ४० लाख रुपये पालक व विद्यार्थ्यांचे वाचले आहेत, अशी माहिती मनविसेचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष संतोष साळवी यांनी सांगितले.
भिवंडीतील डॉ. ओमप्रकाश अग्रवाल इंग्लिश मिडीयम शाळेत चार हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती कोरोनामुळे बिकट झाली आहे. अनेकांचा रोजगार, व्यवसाय बंद पडला आहे. त्यांच्याकडून फी घेऊ नये यासाठी साळवी यांच्या नेतृत्वाखाली शहराध्यक्ष सचिन पाटील, योगेश धुळे व पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने शाळा व्यस्थापनाची भेट घेतली. पालकांच्या बिकट आर्थिक परिस्थितीबाबत विवेचन करून शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी लावून धरली. या मागणीला शाळा व्यवस्थापन अध्यक्ष कमल अग्रवाल,मुख्याध्यापक राम पाटील, प्राथमिक विभाग मुख्याध्यापक एस.डी.धुमाळ यांनी सकारत्मक प्रतिसाद दिला. पालकांच्या आर्थिक परिस्थितीचे भान ठेवून शाळेने जुलै व आॅगस्ट या महिन्यांची प्रत्येकी १००० रुपये फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे विद्यार्थ्यांची तब्बल ४० लाख रुपयांची फी माफ केली असून याबद्दल साळवी यांनी शाळा व्यवस्थापनाचे आभार मानले आहेत.
शाळेने पालकांकडे फीसाठी तगादा लावला होता. फी न भरल्यास विद्यार्थ्यांना आॅनलाइन क्लास आणि परीक्षा देण्याची परवानगी देणार नाही, असे पालकांनी सांगितले. अखेर, मनसेने केलेल्या मागणीनंतर शाळेने जुलै व आॅगस्ट या महिन्यांची प्रत्येकी १००० रूपये फी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे पालकांना दिलासा मिळाला.