लग्नाच्या आमिषाने कर्मचारी महिलेवर व्यवस्थापकाचा बलात्कार; कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Published: August 24, 2023 08:59 PM2023-08-24T20:59:26+5:302023-08-24T21:00:02+5:30
आराेपीचा शाेध सुरू
ठाणे : लग्नाच्या आमिषाने एका ३४ वर्षांच्या माजी कर्मचारी महिलेवर खासगी कंपनीच्या एका विक्री व्यवस्थापकाने वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडित महिलेने कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
ठाण्यातील खोपट परिसरातील एका खासगी कंपनीमध्ये पीडित महिला विक्री प्रतिनिधी म्हणून कार्यरत होती. त्याच कंपनीमध्ये विक्री प्रमुख म्हणून पुनीत नय्यर (३३, रा. मीरा रोड, ठाणे) हाही नोकरीला होता. ती महिला घाेडबंदर रोडवर वास्तव्याला असल्याने दाेघांचाही घरी आणि कामावर जाण्या- येण्याचा मार्ग एकच होता. त्यामुळे घरी सोडण्याच्या बहाण्याने तो तिला त्याच्या मोटारीमधून नेत होता. यातूनच त्यांची मैत्री झाली.
पुनीतने घरी पत्नीशी वाद सुरू असून लवकरच तिच्याशी घटस्फोट घेणार असल्याचे तिला सांगितले. त्याने तिला लग्नाचा प्रस्ताव दिला. त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवत तिने त्याच्या प्रस्तावाला होकार दिला. १० मार्च २०२३ रोजी तिने कौटुंबिक कारणामुळे नोकरी सोडली. यानंतरही त्यांच्या भेटीगाठी होत होत्या. १६ मार्च २०२३ रोजी पुनीतने घाेडबंदर रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवणाच्या बहाण्याने तिला नेले. त्यानंतर महत्त्वाचे बोलायचे असल्याचे सांगत त्याने दुपारी ३:४० वाजेच्या सुमारास जवळच्याच एका लॉजवर नेत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
पत्नीशी घटस्फोट हाेण्यातील विलंबाची वेगवेगळी कारणे देत त्याने वारंवार तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याच काळात त्याने तिच्याकडून ६० हजारांचा मोबाइल, व्हिडिओ गेम खेळण्याचे उपकरण तसेच अडीच लाख रुपये उकळले. वारंवार होणाऱ्या अत्याचारांना कंटाळून तिने २० ऑगस्ट रोजी अखेर त्याला जाब विचारला. त्यावेळी त्याने पुन्हा उडवाउडवीची उत्तरे दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिने अखेर त्याच्याविरुद्ध कासारवडवली पाेलिस ठाण्यात २३ ऑगस्ट २०२३ रोजी बलात्कारासह फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. याबाबत चौकशी सुरू असून आरोपी पुनीतचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेश बाबशेट्टी यांनी सांगितले.