मानवाच्या चांद्रअभियानाचा विद्यार्थ्यांकडून जल्लोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 12:30 AM2019-07-22T00:30:00+5:302019-07-22T00:30:33+5:30
अंबरनाथमध्ये कार्यक्रम : दा. कृ. सोमण यांनी चित्रफितीद्वारे दिली माहिती, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगा
अंबरनाथ : चंद्रावर मानवाने २० जुलै १९६९ रोजी पहिले पाऊल ठेवले. त्याला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्यानिमित्ताने खगोलशास्त्र अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी ५० वर्षांपूर्वीचा अनुभव चित्रफितीद्वारे सादर केला. यावेळी दी एज्युकेशन सोसायटीच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी चित्रफीत पाहून जल्लोष केला. आयुष्यात सर्वांनी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहन सोमण यांनी यावेळी केले.
५० वर्षांनंतर विज्ञानाच्या दृष्टीने अतिशय चांगला सुवर्णयोग जुळून आला आहे. तो म्हणजे ५० वर्षांपूर्वी म्हणजे २० जुलै १९६९ रोजी अपोलो यान चंद्रावर उतरले व मानवाने पहिले पाऊल ठेवले. येत्या सोमवारी चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार आहे. इस्रोच्या स्थापनेला १५ ऑगस्ट रोजी ५० वर्षे होत आहेत. या गोष्टी भारतीयांची मान उंचावणाऱ्या असल्याने जल्लोष करण्याचे आवाहन त्यांनी केले.
चंद्रावर दिवस हा १४ दिवसांचा असतो. तसेच वातावरणाच्या पलीकडे गेलो, तर आकाश काळे दिसते. इस्रोने गेल्या ५० वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे. चांद्रयान-१, मंगळयान, एकावेळी १०४ उपग्रह सोडले आणि आता चांद्रयान-२ सोडण्यात येणार आहे. त्यामुळे साºया जगाचे लक्ष लागले असल्याचे सोमण यांनी सांगितले. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ही सर्व प्रगती कमी वेळेत व अत्यंत कमी खर्चात केली असल्याने इस्रोच्या कार्याचा भारतीय म्हणून प्रत्येकाला अभिमान वाटतो, असेही सोमण यांनी सांगितले.
आपल्या आयुष्यात वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. ते म्हणाले, अलीकडेच चंद्रग्रहण होते. ग्रहणाच्या बाबतीत अनेक गैरसमज आहेत. चमत्कार हा कधीही नसतो. चमत्कारामागील विज्ञानाचा अभ्यास केला की, खरे ज्ञान मिळते, असेही त्यांनी सांगितले.
भाऊसाहेब परांजपे विद्यालयात नेत्रा चव्हाण यांनी स्वागत केले. तर महात्मा गांधी विद्यालयात अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण पाटगावकर यांनी स्वागत केले. नरेंद्र कुलकर्णी, डॉ. गौतम जटाले, डॉ. झरना जटाले, शैलेश रायकर, पंकज भालेराव, संतोष भणगे आदी यावेळी उपस्थित होते.