जानेवारीत रंगणार मनशक्ती माईंड जीम संस्कार विज्ञान सोहळा
By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 2, 2023 12:41 PM2023-01-02T12:41:10+5:302023-01-02T12:42:45+5:30
वैयक्तिक समस्यांवर विनामूल्य वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा या सामाजिक संस्थेतर्फे ठाणे परिसरात ‘संस्कार विज्ञान सोहळा ’हा कार्यक्रम दि. ६ ते ९ जानेवारी २०२३ या काळात होणार आहे. सीकेपी हॉल व एनकेटी कॉलेज हॉल ठाणे या दोन्ही ठिकाणी होणाऱ्या या उपक्रमात विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांसाठी उपक्रमांची आखणी केली आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन ६ जानेवारी २०२३ रोजी स. १० वा. माजी खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे, प्रमुख पाहुणे स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संदीप वासलेकर,सोहळ्याचे अध्यक्ष मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी हे असतील.
शनिवार, ७ जानेवारी २०२३ रोजी संध्या. ५.१५ वाजता ठाणे परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान ‘सन्मान सत्कृत्याचा’ ह्या सत्रात होणार आहे. हा सन्मान डॉ. अशोक मोडक (ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ), विजय बाविस्कर (समूह संपादक लोकमत), रेणू गावस्कर (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या) यांच्या हस्ते होणार आहे. श्यामश्री भोसले, रती भोसेकर, गणराज जैन, प्रसाद कर्णिक. गीता शहा, सतीश धुरत, भटू सावंत, डॉ. उल्का नातू हे सत्कारमूर्ती आहेत.
रविवार, ८ जानेवारी २०२३ रोजी संध्या. ५.१५ वाजता युवकांसाठी -दीपस्तंभांच्या शोधात… हे युवा संवाद सत्र होणार आहे. या उपक्रमात युवा समाजसेवक अमृत अभय बंग, ज्येष्ठ पत्रकार निलेश खरे आणि सत्राचे अध्यक्ष प्रसिद्ध कवी व लेखक प्रवीण दवणे संवाद साधणार आहेत. तर समारोप समारंभ सोमवार, ९ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ६ वाजता होईल. ज्येष्ठ शास्त्रज्ञ मा. डॉ. अनिल काकोडकर, प्रमुख पाहुणे दीपक घैसास, ज्येष्ठ आयटी तज्ज्ञ व उद्योजक, समारंभाचे अध्यक्ष : विजय कुवळेकर, हे असणार आहेत. याशिवाय, दररोज विविध विषयांवर विनामूल्य विवेचने असणार आहेत. त्यात विद्यार्थ्यांसाठी ताणमुक्त अभ्यासयश, पालकांसाठी विवेकी पालकत्व, तरुणांसाठी यौवनातील महत्वाकांक्षा, मोठ्यांसाठी कुटुंबसौख्य, ताणव्यवस्थापन, मत्सरघात आणि वास्तुशुद्धी, मनोधैर्यासाठी ध्यान, १ ते ७ वयोगटातील मुला-मुलींच्या पालकांसाठी बालकाची मेंदूक्रांती, गर्भधारणेच्या पूर्वतयारीसाठी सुप्रजनन, ज्येष्ठांसाठी सुखद जीवनसंध्या इ. विषय हाताळले जाणार आहेत.
वैयक्तिक समस्यांवर विनामूल्य वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध असणार आहे. मनशक्ती केंद्राचे वैशिष्ट्य असलेल्या माइंड जिम प्रकल्पातील माइंड ट्रेनिंग ॲक्टिव्हिटीज प्रत्यक्ष पाहायला आणि करायला मिळणार आहेत. मानस यंत्र चाचण्यांमध्येही सहभाग घेता येईल. चाचणी झाल्यावर त्याचा रिझल्ट दिला जाईल व त्याबद्दल मार्गदर्शन केले जाईल. विविध विषयांवरील प्रदर्शन व ग्रंथ साहित्य प्रदर्शनही असणार आहे. याशिवाय, रोज संध्याकाळी ७ वाजता मुख्य विवेचन होणार आहे.
गर्भसंस्कार, सुजाण पालकत्व, आरोग्य प्राप्ती, व्यक्तिमत्व विकास या विषयांवर एक दिवसाच्या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. शिवाय सर्वकल्याणासाठी सामुदायिक सत्यपूजा, ३ ते ६ वयोगटातील मुले-मुली व पालकांसाठी मेधासंस्कारही आयोजित केले आहेत. अधिक माहिती साठी संपर्क ९७६९९०६७२६ अथवा www.manashakti.org या वेबसाईटला भेट द्यावी असे आवाहन आयोजकांनी केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"